विराज प्रकल्पाविरोधात भूमिपुत्रांचा एल्गार; महिलांची ठाम हजेरी

विराज प्रकल्पाविरोधात भूमिपुत्रांचा एल्गार; महिलांची ठाम हजेरी
Published on

विराज प्रकल्पाविरोधात एल्गार
प्रस्तावित विस्तारीकरणाला भूमिपुत्रांचा विरोध

बोईसर, ता. ४ (वार्ताहर) : मान-वारांगडे परिसरातील भूमिपुत्रांनी विराज प्रोफाईल कंपनीच्या प्रस्तावित विस्तारीकरण प्रकल्पाविरोधात शनिवारी (ता. ४) वारंगडा येथील कंपनी गेटवर मोर्चा काढत आंदोलन केले. या मोर्चात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कंपनी गेटसमोर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येत्या ८ एप्रिलला होणाऱ्या जनसुनावणीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. जनसुनावणी कंपनीच्या प्रांगणातच आयोजित करण्याच्या निर्णयावर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, विराज प्रोफाईल कंपनीकडून सुमारे १०४ एकर क्षेत्रावर हॉट स्टेनलेस स्टील निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर-२ उपप्रादेशिक कार्यालयामार्फत ८ एप्रिलला जनसुनावणी होणार आहे; मात्र २४ मार्चला झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवणारा ठराव मंजूर केला आहे. मान, वारांगडे, बेटेगाव, महागाव आणि गुंदले ही गावे पेसा क्षेत्रात येत असल्याने ग्रामसभेच्या निर्णयाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाद चिघळण्याची चिन्हे
जनसुनावणीसाठी अपुरा कालावधी देण्यात आल्याचा आणि ती कंपनीच्या प्रांगणातच आयोजित केल्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकल्प विद्यमान प्रकल्पापेक्षा अनेक पटीने मोठा असल्याने पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची गंभीर दखल घेऊन जनसुनावणी रद्द करण्याची मागणी संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे. दरम्यान, ८ एप्रिलच्या जनसुनावणीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com