पंढरपूर आषाढीवारीसाठी सायकलपटू महिलांचा सराव

पंढरपूर आषाढीवारीसाठी सायकलपटू महिलांचा सराव
Published on

आषाढी वारीसाठी ‘सायकल सखी’ सज्ज
डोंबिवलीतील महिला सायकलपटूंची सरावासाठी प्रति पंढरपूर-आळंदी राईड

कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील महिलांच्या सायकल सखी ग्रुपला आता आषाढी वारीचे वेध लागले आहेत. या वारीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून ग्रुपमधील धाडसी सायकलपटू योगिता थोटांगे (४३) यांनी रविवारी कर्जतजवळील प्रति पंढरपूर-आळंदी हे सुमारे १२० किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तास ४० मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आषाढी वारीनिमित्त दरवर्षी या ग्रुपच्या महिला आणि पुरुष मंडळी सायकलने पंढरपूरला जातात. यंदाच्या वारीसाठी १ एप्रिल ते ३० जून या तीन महिन्यांच्या कालावधीत रोज २० ते ३० किलोमीटर सरावाचे नियोजन करण्यात आले आहे. या सरावाचाच एक टप्पा म्हणून रविवारी पहाटे ५ वाजता योगिता थोटांगे आणि प्रशांत विसपुते (६२) यांनी ही राईड सुरू केली.

अनुभवी सायकलपटूंची साथ
या मोहिमेत ठाणे/मुंबई येथील एमडीव्ही सायकलिस्ट ग्रुपची मोलाची साथ लाभली. सायकलिंगचा प्रसार करणारे महेश दाभोळकर आणि परिचित पाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ही राईड पूर्ण झाली. विशेष म्हणजे ७३ वर्षांचे अनिल सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या अनुभवाने आणि जिद्दीने सर्व तरुण सायकलपटूंना प्रेरणा दिली.

योगिता थोटांगे यांची देदीप्यमान कामगिरी
योगिता थोटांगे यांनी यापूर्वी अनेक राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. कॅन्सरग्रस्त मुलांच्या मदतीसाठी डिसेंबर-जानेवारीमध्ये ८९९ किलोमीटरची कॅन्सर राईड यशस्वीपणे पूर्ण केली. तसेच पुणे सायक्लोथॉन, बोईसर-जव्हार क्लासिक, सातारा हुतात्मा चॅलेंज (८०० किमी) आणि अमरावतीमधील शिवजयंती सायकलिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. आतापर्यंत ५० हून अधिक पदके आणि स्मृतिचिन्हे त्यांनी पटकावली आहेत.

सामाजिक बांधिलकी
केवळ सायकलिंगच नव्हे, तर सायकल सखी ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य जागृती शिबिरे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. लहान मुले आणि महिलांना सायकल चालवण्याचे धडे देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश हा ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून देत आहे. आषाढी वारीच्या माध्यमातून आरोग्याचा आणि भक्तीचा अनोखा संगम यंदाही पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com