

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान गरजेचे
शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचे प्रतिपादन
घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) : विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचालित विकास हायस्कूल (प्राथमिक विभाग मराठी व इंग्रजी माध्यम) येथे आधुनिक शिक्षण पद्धतीकडे वाटचाल करत इंटरॲक्टिव्ह इंटेलिजंट पॅनल बोर्डचे उद्घाटन सोमवारी (ता. ६) रोजी सकाळी ११.३० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या डिजिटल उपक्रमाचे उद्घाटन मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग अत्यावश्यक असल्याचे सांगितले. शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न व आव्हानांवर मात करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. संस्थांनी आपल्या मागण्या शासनाकडे मांडाव्यात, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी डिजिटल साधनांची उपलब्धता करून देण्यात डॉ. विशाल कडणे तसेच ओटीस अँड टिचमिंट टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांचे विशेष योगदान असल्याचा उल्लेख या वेळी करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. विनय राऊत, विश्वस्त मंडळातील मान्यवर, मिलिंद विद्यालय पवईचे संचालक सदानंद रावराणे, डी. एस. हायस्कूल सायनचे संचालक राजेंद्र प्रधान, डॉ. विशाल कडणे (विश्वस्त, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ) यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनानंतर महामुंबई शिक्षण संस्था संघटना, मुंबई व ठाणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत शैक्षणिक क्षेत्रातील सध्याची आव्हाने, डिजिटल परिवर्तन आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
विद्या विकास शिक्षण संस्थेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, या डिजिटल उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक आकर्षक, अनुभवाधारित व परिणामकारक शिक्षण मिळणार असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.