असावागड दुर्ग स्वच्छता अभियान यशस्वी

असावागड दुर्ग स्वच्छता अभियान यशस्वी
Published on

असावागड स्वच्छता अभियानात दुर्गप्रेमींचा सहभाग

कासा, ता. ९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक असावागडावर युवासेना गडकिल्ले संवर्धन कक्ष, महाराष्ट्र तसेच श्री असावागड स्थानिक दुर्गसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ही असावागड स्वच्छता मोहीम क्रमांक-२ उत्साहात पार पडली असून, एकूण ४३ दुर्गप्रेमींनी यात सक्रिय सहभाग नोंदवला.

मोहिमेची सुरुवात रविवारी (ता. ५) सकाळी झाली व सोमवारी (ता. ६) सायंकाळी ती यशस्वीरीत्या पूर्ण झाली. अनेक दुर्गप्रेमींनी गडावर मुक्काम करीत पहाटेपासून स्वच्छता व संवर्धनाचे काम हाती घेतले. किल्ल्यावरील परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिक व इतर कचरा हटवणे तसेच गडाच्या जतनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. या मोहिमेत आप्पा चौधरी, प्रीतम पाटील, ओम सकपाळ, तन्मय प्रभू, दुर्गेश गोतरणे यांच्यासह अनेक दुर्गप्रेमी सहभागी झाले होते. या मोहिमेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.
विशेष म्हणजे या उपक्रमात तरुणांसह महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत देशभक्तीची भावना आणि सांस्कृतिक जपणूक अधोरेखित केली. दरम्यान, डहाणूजवळील अशेरीगड व सोगवागड येथेही अशाच प्रकारचे स्वच्छता व संवर्धन अभियान सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

आगामी मोहिमांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच प्रत्येकाने किमान एक नवीन सदस्य जोडून गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले.
‘दुर्गाः राष्ट्रस्य कीर्तिः, संवर्धनं मम धर्मः’ या घोषवाक्याने प्रेरित होऊन ही मोहीम राबविण्यात आली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com