आनंद नगर उड्डाणपुलावरील रस्त्याच्या उंचीमुळे नागरिक त्रस्त

आनंद नगर उड्डाणपुलावरील रस्त्याच्या उंचीमुळे नागरिक त्रस्त
Published on

आनंदनगर उड्डाणपुलावरील रस्त्याच्या उंचीमुळे नागरिक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी

मालाड, ता. १० (बातमीदार) : दहिसर पूर्वेतील आनंदनगर येथील उड्डाणपुलावर सध्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असताना, रस्त्याची अनियमित उंची आणि त्यावर टाकलेल्या डांबरखडीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

आविष्कार इमारतीजवळील या टोकावर गेल्या तीन वर्षांपासून पुलावरील काँक्रीट हा रस्त्यावर अनावश्यक टाकण्यात आल्याने रस्त्याची सपाटी उंचावली असून, तो वर-खाली अशा प्रमाणात झाला आहे. परिणामी, येथून जाणाऱ्या डंपर, टँकर, काँक्रीट मिक्सर, टेम्पो आदी जड वाहनांमुळे मोठा आवाज निर्माण होत असून, आसपासच्या सोसायट्यांतील रहिवाशांना अहोरात्र ध्वनिप्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी हा त्रास अधिक जाणवत असून, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच लहान मुलांच्या झोपेवर परिणाम होत आहे. सध्या शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळे निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या समस्येकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते राजेश पंड्या यांनी संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन प्रश्न उपस्थित केला आहे की, काँक्रीट रस्त्यावर डांबरखडी टाकण्यामागील कारण काय? तसेच, रस्त्याची योग्य समांतरता साधण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे काम करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या समस्येबाबत पालिकेच्या पूल विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.

लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नागरिकांच्या समस्येचे तातडीने निराकरण करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. तसेच जर यावर एखादा अपघात घडला तर जवाबदार कोण? १५ दिवस उलटले तरी पालिकेकडून आम्हाला साधं उत्तर नाही.

- राजेश पंड्या, सामाजिक कार्यकर्ते

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com