

वंध्यत्व उपचारांबाबत मोठा संभ्रम
कामा रुग्णालयाच्या अभ्यासातून वास्तव समोर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : वंध्यत्वाच्या उपचारांसाठी दाम्पत्यांकडून होणारा विलंब आणि एआरटी (असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी) सेवांमधील शहरी-ग्रामीण भागातील तफावत हे दोन गंभीर मुद्दे समोर आले आहेत. कामा अँड ऑल्ब्लेस रुग्णालयाच्या एआरटी सेंटरने केलेल्या अभ्यासानुसार ४१ टक्के दाम्पत्ये लग्नानंतर ५ ते १० वर्षांनीच उपचारांसाठी पुढे येतात. यामुळे गर्भधारणेचा यशदर कमी होतो, असे स्पष्ट झाले आहे.
ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान ६० रुग्णांवर केलेल्या या अभ्यासात ४६.०६ टक्के रुग्ण ३१ ते ३५ वयोगटातील असल्याचे आढळले, तर सरासरी वय ३३.२ वर्षे नोंदवण्यात आले. वयानुसार प्रजननक्षमता कमी होत असल्याने उपचारात होणारा विलंब हा चिंतेचा विषय ठरत आहे. अभ्यासात ५१.६७ टक्के प्रकरणांमध्ये प्राथमिक वंध्यत्व, तर ४८.३३ टक्के रुग्णांमध्ये दुय्यम वंध्यत्व आढळले. तपासणीत ७१.६ टक्के महिलांच्या फॅलोपियन ट्युब सामान्य असल्याने हार्मोनल असंतुलन आणि ओव्ह्युलेशनशी संबंधित समस्या ही प्रमुख कारणे असू शकतात, असे निष्कर्ष नोंदवण्यात आले.
याचबरोबर एआरटी सेवांचा लाभ मुख्यतः शहरी भागापुरताच मर्यादित असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अभ्यासानुसार ९६.६ टक्के रुग्ण शहरी भागातील असून, ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रमाण केवळ ३.४ टक्के आहे. ग्रामीण भागात जागरूकतेचा अभाव, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि एआरटी केंद्रांची अनुपलब्धता यामुळे अनेक जोडपी उपचारापासून वंचित राहत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, वेळेवर वैद्यकीय सल्ला न घेणे, सामाजिक संकोच आणि माहितीचा अभाव यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे वेळेत तपासणी, समुपदेशन आणि जिल्हा स्तरावर एआरटी सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
......................................
हा अभ्यास सर्वसामान्यांना मदत व्हावी, या उद्देशाने करण्यात आला आहे. सुमारे ९६ टक्के रुग्ण शहरी भागातील असून, ४६ टक्के रुग्ण ३१-३५ वयोगटातील आहेत. वंध्यत्व ही केवळ वैद्यकीय नव्हे, तर सामाजिक आणि मानसिकदृष्ट्याही परिणाम करणारी समस्या आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एआरटी सेवा विस्तार, जनजागृती आणि रेफरल प्रणाली मजबूत करण्याची गरज आहे.
- डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.