

वाणगाव, ता. १२ (बातमीदार) : निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे रोगराईचे संकट वाढल्याने फुलकिडीचे संकट सावरताना त्यातच आखाती देशांतील युद्धामुळे मिरची वाहतूक करणारे अनेक कंटेनर बंदरातच अडकल्याने परदेशात होणारी निर्यात ठप्प झाली. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत आवक वाढली असून, मिरचीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
पालघर जिल्ह्यात वाणगाव, चिंचणी, डहाणू, पालघर भागातील मिरची जगात प्रसिद्ध आहे. सध्या उष्णतेत वाढ झाल्यामुळे ब्लॅक थ्रिप्स या किडीने डोके वर काढून मिरची उत्पादकांना हैराण केले आहे. त्यातच युद्धामुळे बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. सद्य:स्थितीत मिरचीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे मागील महिनाभरात साधारणत: जिल्ह्यातील मिरचीचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.
पालघर जिल्ह्यात सरासरी १,२०० ते १,३०० हेक्टरवर तिखट मिरचीची लागवड आहे. युद्धापूर्वी सरासरी १०० रुपये प्रति किलो मिरचीला भाव होता. त्यावर आधारित विचार करता सरासरी एकरी दोन लाख ४० हजार ते तीन लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित होते, परंतु युद्धानंतरच्या परिस्थितीत तब्बल सरासरी ५० रुपये किलोने बाजारभाव घसरल्याने उत्पन्न निम्मे झाले आहे. तब्बल एकरी एका लाखापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्याचा विचार करता जवळपास कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसांत अजूनही घसरण होऊन सरासरी ३० ते ३५ रुपये किलोला भाव मिळत आहे, अशी माहिती वाणगाव परिसरातील प्रगतिशील शेतकरी नीलेश पाटील यांनी दिली.
बाजारभाव घसरला
वाणगावच्या मिरचीने मागील अनेक वर्षांत मुंबई, दादर, वाशी मार्केटसह परदेशातही ओळख निर्माण केलेली आहे. युरोप, युएई, अमेरिका, सौदी अरेबिया अशा अनेक देशांमध्ये येथील मिरचीची निर्यात होते. निर्यातक्षम मिरचीला भावही चांगला मिळत असल्याने शेतकरी सुखावला होता, परंतु अचानक युद्धाचे संकट ओढवल्याने परदेशात होणारी मिरचीची वाहतूक थांबली आहे.
१३० रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव
सुरुवातीच्या टप्प्यात मिरचीला ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत होता. मात्र, मागणी वाढल्याने मागील काही दिवसांत हा भाव थेट १३० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला होता. मधल्या काळात ७० ते १०० रुपये प्रतिकिलो मिरचीला भाव मिळत असल्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अचानक युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळे परदेशात होणारी निर्यात थांबल्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे.
यंदा मागील अनेक वर्षांच्या तुलनेत मिरचीला चांगला भाव होता. ब्लॅक थ्रिप्सचे संकट सावरत असताना अचानक युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळे बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. तब्बल सरासरी ५० रुपये प्रतिकिलोने उत्पन्नात घट झाल्याने १० लाखांपेक्षा अधिक नुकसान सोसावे लागले आहे.
- नीलेश पाटील, मिरची उत्पादक शेतकरी, बाडापोखरण, वाणगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.