

ठाकरेंच्या मोर्चात
‘मविआ’ची एकजूट
काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकापच्या नेत्यांची हजेरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंनी काढलेल्या गर्जना मोर्चात महाविकास आघाडीच्या (मविआ) एकजुटीचे दर्शन घडले. भाजपपासून फारकत घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासोबत एकत्र येत ‘मविआ’च्या माध्यमातून लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढविल्या होत्या. राज ठाकरे तेव्हा दोन हात लांब राहिले होते; मात्र आज ठाकरेंच्या गर्जना मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मविआचे इतर नेतेही सहभागी झाल्याने ही भविष्यातील वेगळ्या राजकीय समीकरणाची नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापसह अन्य पक्षांनी एकत्र येत भाजपविरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकीची मोट बांधली होती. त्याला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले होते; मात्र त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने ‘मविआ’मध्ये कुरबुरी सुरू झाल्या होत्या. त्यानंतर मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही त्यांनी स्वबळावर लढवल्याने ‘मविआ’त मतभेदाची दरी वाढत जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. पुढे राज ठाकरे ‘मविआ’सोबत येणार का, याबाबत वेळोवेळी तर्क-वितर्क लढवले जात होते. त्यातच केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित मार्चा काढण्याची घोषणा केली. त्यात ‘मविआ’चा भाग असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि अन्य पक्ष सहभागी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील असे अनेक नेते मार्चात सहभागी झाले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात अनेकदा काँग्रेसबाबत सकारात्मक भूमिका मांडली. त्यामुळे भविष्यात ‘मविआ’त आणखी एक भिडू वाढणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.