

नागपुरात ५०० किलो गांजा जप्त; तिघांना अटक
नागपूर, ता. ४ : अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) नागपुरात कारवाई करून स्टील पाइपमध्ये लपवून आणलेला ५०० किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. हा गांजा ओडिशातील संबलपूर येथून नागपुरात आणण्यात आला होता. त्यानंतर तो महाराष्ट्रातील जालना आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वितरित केला जाणार असल्याची माहिती ‘एनसीबी’ने रविवारी (ता. ४) दिली.
एनसीबी मुंबईच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रविवारी (ता. ४) नागपुरात पश्चिम बंगाल नोंदणीच्या मालवाहू ट्रकवर पाळत ठेवण्यात आली. तपासणीदरम्यान स्टील पाइपमध्ये लपवून ठेवलेला ५०० किलो गांजा आढळला. याप्रकरणी आर. पी. गोलदार आणि ए. सरकार यांच्यासह नागपुरातील गांजा घेणारा एस. ए. एस. युसूफ ऊर्फ राजाभाई याला अटक करण्यात आली. एनसीबीच्या माहितीनुसार, नागपुरातील हे अमली पदार्थांचे जाळे ओडिशातून गांजा आणून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत त्याचा पुरवठा करत होते. कारवाईपासून बचाव करण्यासाठी तस्करांकडून नेहमीच्या मार्गाऐवजी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला जात होता. युसूफ ऊर्फ राजाभाई हा गेल्या चार-पाच वर्षांपासून अमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांत काही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हेही दाखल असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणातील अन्य साथीदारांचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. एनसीबीने यापूर्वी ११ एप्रिलला नागपुरात २०९.८५० किलो, २२ मे रोजी गोंदिया जिल्ह्यात ७०२ किलो आणि ३० जूनला भंडारा जिल्ह्यात २४५ किलो गांजा जप्त केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.