

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील बहुतांश गाव-पाड्यांसह शहरेदेखील तहानलेली आहेत. ठाणे शहराला पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी, उपलब्ध स्रोतांवरील मर्यादा यामुळे पाणीपुरवठ्याचे भवितव्य चिंताजनक बनले आहे. शहराला दररोज ६२१ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात ५९० एमएलडीच उपलब्ध होत असल्याने तब्बल ३१ एमएलडीची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ठाणे महापालिकेने आता मुंबई महापालिकेकडे पिसे बंधाऱ्यातून दररोज ५० एमएलडी कच्चे पाणी देण्याची मागणी केली आहे.
ठाण्याला सध्या एकूण ५९० एमएलडी पाणी मिळते, मात्र शहराची २०२५ मधील लोकसंख्या सुमारे २९.८१ लाखांवर पोहोचल्याने विद्यमान स्रोतांवरील ताण वाढत आहे. अशातच दुसरीकडे सूर्या प्रकल्पातून मिरा-भाईंदरला २१८ एमएलडी पाणी मिळाल्यानंतर स्टेम आणि एमआयडीसीकडून प्रत्येकी ५० एमएलडी अतिरिक्त पाणी ठाण्याला मिळण्याची अपेक्षा आहे, मात्र सूर्या प्रकल्पाचे पाणी अद्याप सुरू झालेले नसल्याने या अतिरिक्त पाणीपुरवठ्यालाही विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची ३१ एमएलडीची तूट भरून काढण्यासाठी मुंबईकडून मिळणारे प्रस्तावित ५० एमएलडी कच्चे पाणी ठाण्यासाठी तातडीचा आधार ठरणार आहे.
शुल्क भरण्याची तयारी
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून ही मागणी केली. या प्रस्तावासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाली असून, प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या टप्प्यात असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. आवश्यक शुल्क भरण्याची तयारीही ठाणे महापालिकेने दर्शविली आहे.
शुद्धीकरण क्षमता वाढली; कच्च्या पाण्याची कमतरता
अमृत २.० अंतर्गत टेमघर जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता २८० वरून ३३६ एमएलडीपर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यासाठी ९०० अश्वशक्तीच्या आठऐवजी १,२७० अश्वशक्तीचे आठ पंप बसविण्यात येत आहेत, मात्र भातसा धरणातून कच्चे पाणी उचलण्याचा ठाण्याचा कोटा अद्याप २५० एमएलडीच आहे. त्यामुळे शुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढत असली तरी त्याचा पूर्ण वापर करण्यासाठी कच्च्या पाण्याचा अतिरिक्त स्रोत आवश्यक आहे.
महापालिकेकडून पाठपुरावा
ठाणे महापालिकेने यापूर्वी मुंबईकडे ५० एमएलडी शुद्ध पाण्याची मागणी केली होती, मात्र मुंबईकडून बाळकुम येथे केवळ पाच एमएलडी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले. उर्वरित पाणी देणे शक्य नसल्याने आता मुंबईच्या कच्च्या पाण्याच्या कोट्यातून ५० एमएलडी पाणी मिळावे, यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
२०४० मध्ये गरज ९९२ एमएलडी
ठाण्याची पाण्याची गरज आगामी काळात झपाट्याने वाढणार आहे. २०४० मध्ये शहराला ९९२ एमएलडी, तर २०५५ मध्ये तब्बल १,२८३ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. सूर्या प्रकल्प, काळू धरण, स्टेम, एमआयडीसी, महापालिकेची योजना आणि मुंबई महापालिका अशा विविध स्रोतांवर भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन अवलंबून आहे.
ठाणे शहराचा पाणीपुरवठा
स्रोत पाणीपुरवठा (दशलक्ष लिटर)
ठाणे पालिका २५०
स्टेम प्राधिकरण ११५
एमआयडीसी १३५
मुंबई पालिका ९०
पाण्याची मागणी
स्रोत वाढीव मागणी (दशलक्ष लिटर)
भातसा धरण (ठाणे पालिका) ५०
बारवी धरण १००
मुंबई पालिका ५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.