

अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) : पूर्व भागातील महिला कल्याण केंद्रासाठी आरक्षित जागेची मोजणी करण्यास नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या जागेवर महिला वसतिगृह आणि कँटीन उभारण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.
नगर परिषदेची ३० सप्टेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक २३ अंतर्गत आरक्षण क्रमांक १२९, ‘महिला कल्याण केंद्र’ या जागेच्या मोजणीचा प्रस्ताव मांडण्यात आला. उपअधीक्षक, भूमी अभिलेख, अंबरनाथ यांच्यामार्फत मोजणी करण्यास प्रशासकीय; तसेच मोजणी शुल्कासाठी वित्तीय मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अर्ज, आवश्यक कागदपत्रे आणि पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
गोविंदतीर्थ पूल ते शिवाजीनगर हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या २४ मीटर रस्त्यावरील आरक्षण क्रमांक १२९च्या जागेवर महिलांसाठी वसतिगृह आणि कँटीन उभारावे, अशी मागणी शेख यांनी केली होती. यासाठी त्यांनी २८ मे २०२५ रोजी निवेदन, तर २४ जून २०२६ रोजी स्मरणपत्र देऊन पाठपुरावा केला होता. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त शहरात येणाऱ्या महिलांना सुरक्षित व परवडणारी निवासव्यवस्था उपलब्ध करून देणे हा या मागणीमागील उद्देश आहे. या ठरावाला भाजपचे गटनेते अभिजित करंजुळे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभागृहाने ठराव सर्वानुमते मंजूर केला.
अतिरिक्त आरक्षणांचा प्रस्ताव
याच ठरावात संबंधित शासकीय भूखंडावर ५० एकर क्षेत्रावर ‘प्रादेशिक वैद्यकीय सुविधा केंद्र’, ३० एकर क्षेत्रावर ‘प्रकल्पबाधितांसाठी घरे’ आणि पाच एकर क्षेत्रावर ‘सार्वजनिक कार्यालय व कर्मचारी निवासस्थान’ अशी अतिरिक्त आरक्षणे विकास योजनेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यासही मान्यता देण्यात आली. त्यामुळे आरोग्य सुविधा, प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन आणि सार्वजनिक सुविधांच्या नियोजनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
नऊ मीटर रस्त्याचा प्रस्ताव स्थगित
अंबरनाथ पूर्वेकडील रुक्मिणी अपार्टमेंट आणि आसावरी अपार्टमेंटमधून जाणाऱ्या १२ मीटर डी.पी. रस्त्याला २४ मीटर बायपास रस्त्याशी जोडणाऱ्या रस्त्याच्या मोजणीस सभेत प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली. मात्र, महिला कल्याण केंद्राशेजारील वडारवाडी-शिवाजीनगरकडे जाणाऱ्या नऊ मीटर डी. पी. रस्त्याचा प्रस्ताव पूरक माहिती मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यात आला. हा रस्ता विकसित झाल्यास दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.