स्वच्छतेचा ‘श्वास’ कोंडला

स्वच्छतेचा ‘श्वास’ कोंडला
Published on: 

वसई, ता. ५ (बातमीदार) : एकीकडे वसई-विरार शहर महापालिका आरोग्य आणि स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून नवनवीन योजना आणत आहे. या सुविधांचा नागरिकांना फायदा मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचा दावा केला जात असला, तरी दुसरीकडे शहरातील वास्तव आरोग्याला आव्हान देणारे ठरत आहे. सद्य:स्थितीत शहरात स्वच्छतेचा श्वास कोंडीने गुदमरू लागला असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.

महापालिकेकडून ‘कचरामुक्त शहर’ आणि ‘शून्य कचरा’ अशा विविध घोषणा सातत्याने केल्या जातात. यासाठी व्यापक स्वच्छता अभियाने राबवली जातात तसेच नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी पथनाट्ये, समुद्रकिनारे स्वच्छता मोहीम आणि रॅली यांसारखे उपक्रमही हाती घेतले जातात. याशिवाय घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेकडून विविध योजनाही आखल्या जात आहेत. परंतु प्रत्यक्षात वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार या चारही शहरांतील सार्वजनिक परिसरात दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग साचताना दिसत आहेत.

वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण, व्यावसायिक व निवासी आस्थापनांची झालेली वाढ यामुळे घनकचऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नागरिक, सोसायट्या, हॉटेल, रुग्णालये, मॉल आणि बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर ओला किंवा जैविक कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या आस्थापनांनी स्वतःच्या स्तरावरच कचऱ्यावर प्रक्रिया करावी, असे आवाहन महापालिकेने नुकतेच केले आहे. मात्र, महापालिकेची ही ‘शून्य कचरा मोहीम’ कागदावरून उतरून प्रत्यक्ष जमिनीवर कधी यशस्वी होईल आणि शहराला प्रदूषणाच्या विळख्यातून कधी मुक्ती मिळेल, याचीच वाट आता त्रस्त नागरिक पाहात आहेत.

व्यापक जनजागृतीची गरज
कचऱ्यामुळे हवा, जमीन आणि पाणी प्रदूषित होते. याचा परिणाम हा पर्यावरण व नागरिकांवर होऊ शकतो. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे व शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेला व्यापक जनजागृतीचा अवलंब करावा लागणार आहे.

‘प्लॅस्टिक’चा पसारा
वसई विरार शहरात प्लॅस्टिकवर कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्यात प्लॅस्टिकचा पसारा दिसून येत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे समोर येत आहे.

घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. निवासी, विविध आस्थापनांना कचऱ्याची निर्मिती होते त्याच ठिकाणी विल्हेवाट लावणासाठी आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा काेंडी होऊ नये, याची खबरदारी घेण्यात येत आहे.
- अजीव पाटील, महापौर

वसई : शहरातील प्रमुख मार्गांवर उघड्यावरील कचऱ्यामुळे अस्वछता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com