

कांद्याच्या भावात घसरण
प्रतिकिलो ४० ते ४५ रुपयांचा भाव ः ग्राहकांना दिलासा
जुईनगर, ता. ६ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कांद्याच्या भावाने अखेर घसरणीला सुरुवात केली आहे. एपीएमसीच्या घाऊक बाजारात मंगळवारी (ता. ५) कांद्याला प्रतिकिलो ४० ते ४५ रुपयांचा भाव मिळाला. मागील आठवड्यात बटाट्याच्या भावात झालेली पाच ते सहा रुपयांची वाढ अजूनही कायम असून, गेल्या अनेक महिन्यांपासून लसणाचे भाव मात्र स्थिर आहेत.
एपीएमसीच्या बाजारात कांद्याची नियमित आवक सुरू असली तरी ५२ किलोवरील वजनाची गोणी खाली न करण्याच्या माथाडी कामगारांच्या निर्णयाने जवळपास १० ते १२ गाड्या बाजार आवारात माल घेऊन उभ्या आहे. विशेष म्हणजे दिल्ली आणि बंगळूरसह देशभरातील बाजारपेठांमध्ये कांदा भाव घसरले आहेत. त्यात इजिप्त कांदा आयात केला गेला असल्याने कांदा भावावर काहीसा परिणाम दिसून येत होता, मात्र आता कांदा भावात घसरण सुरू झाल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे. यंदा पावसामुळे अनेक भागांमध्ये कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यात काही ठिकाणी दुष्काळाच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना बसल्याने कांद्याचे भाव कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
भावातील चढ-उतार सुरू
कांद्याच्या भावात गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. जुलै महिन्यापर्यंत एपीएमसीच्या घाऊक बाजारात कांदा साधारण १२ ते १५ रुपये प्रतिकिलो भावाने विकला जात होता. जुलैमध्ये त्याच्या भावात वाढ होऊन तो २५ ते २८ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर ऑगस्टमध्ये कांद्याच्या भावाने आणखी उसळी घेत ४० ते ४५ रुपयांचा टप्पा गाठला, तर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच कांदा ५२ ते ५३ रुपयांवर पोहोचून पूर्ण महिनाभर भाव टिकून राहिले.
राष्ट्रीय बाजार एपीएमसी घाऊक भाव (प्रतिकिलो)
कांदा ४० ते ४५
बटाटा १५ ते २०
लसूण १५० ते २२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.