घाटकोपरमध्ये दोन मजली उड्डाणपूल

घाटकोपरमध्ये दोन मजली उड्डाणपूल
Published on: 

घाटकोपरमध्ये दोन मजली उड्डाणपूल
पूर्व-पश्चिम वाहतूक होणार सुलभ; स्थानिक, मुख्य वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : घाटकोपर पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचा (आरओबी) सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थानिक रहिवाशांचा पूर्व-पश्चिम प्रवास सुलभ करण्यासाठी श्रीयस (एलबीएस) जंक्शन ते पंतनगर जंक्शनदरम्यान रेल्वे मार्गावर स्वतंत्र पूल उभारण्यात येणार आहे. त्याच वेळी मुख्य केबल-स्टेड पूल काही मीटर उंच करण्यात येणार आहे. या पुलावरून पूर्व द्रुतगती मार्ग आणि अंधेरीच्या दिशेची मुख्य वाहतूक धावणार आहे. त्यामुळे स्थानिक आणि मुख्य वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होऊन घाटकोपरमधील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
मूळ आराखड्यानुसार जीर्ण झालेला जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी केबल-स्टेड पूल उभारण्याचे नियोजन होते. या पुलावरूनच घाटकोपर पूर्व आणि पश्चिम भागातील वाहतूक करण्याची व्यवस्था होती. त्यामुळे पश्चिमेकडील रहिवाशांना पूर्वेकडे जाण्यासाठी श्रीयस जंक्शनपर्यंत जाऊन यू-टर्न घ्यावा लागला असता. परिणामी, स्थानिक प्रवासाचे अंतर आणि वेळ वाढण्याची शक्यता होती.

स्थानिकांसाठी स्वतंत्र पूल
घाटकोपरच्या पूर्व भागात शाळा, बाजारपेठा आणि मोठी रुग्णालये आहेत. तसेच रेल्वे स्थानक आणि प्रभाग कार्यालयासारखी महत्त्वाची ठिकाणेही पूर्वेकडे आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना मुख्य पुलावरील मोठ्या वाहतुकीतून जावे लागू नये, यासाठी दोन स्तरांचा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. महापालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एमआरआयडीसी) हा सुधारित आराखडा तयार केला आहे.

३+३ लेनचा सुधारित आराखडा
प्रस्तावित पुलाचे सुमारे ३० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम सुरू आहे. या टप्प्यावर आवश्यक बदल करणे शक्य आहे. मूळ आराखड्यात एलबीएस जंक्शनवरून जाणाऱ्या पुलासाठी २+२ लेनची व्यवस्था होती. भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन सुधारित आराखड्यात ३+३ लेनची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तीन पिअरच्या रचनेत बदल
सुधारित आराखड्यानुसार आरपी-१५, आरपी-१६ आणि आरपी-१७ या तीन पिअर कॅप्सचा काही भाग पाडून त्यांची उंची वाढविण्यात येणार आहे. या बदलामुळे दुय्यम पूल उभारता येणार आहे. या ठिकाणी पूर्वी सुमारे चार मीटरची उंची होती. आता ५.५ मीटर उंची ठेवण्यात येणार असल्याने अवजड वाहनांची वाहतूकही सुरळीत होईल.

पुढील ८० ते १०० वर्षांचा विचार
नव्या पुलाचे अपेक्षित आयुष्य सुमारे ८० ते १०० वर्षे आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन आवश्यक बदल आताच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूल पूर्ण झाल्यानंतर त्यात बदल करणे अधिक कठीण ठरू शकते. स्थानिक रहिवाशांनीही पूर्व-पश्चिम प्रवासासाठी स्वतंत्र मार्गाची मागणी केली होती. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास, बाजारपेठा, रेल्वे स्थानक तसेच प्रभाग कार्यालयात जाण्यासाठी हा स्वतंत्र मार्ग अधिक सोयीचा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com