

नवी मुंबई विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीला नवे पंख
‘एफएलवाय९१’चे पहिले विमान दाखल; सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा व अगत्तीला थेट जोडणी
पनवेल, ता. ६ (बातमीदार) ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देशांतर्गत हवाई जोडणीच्या विस्तारात एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. गोवा मुख्यालय असलेल्या प्रादेशिक विमान कंपनी एफएलवाय९१ च्या विमानाचे सोमवारी (ता. ५) नवी मुंबई विमानतळावर प्रथमच आगमन झाले.
हैदराबादहून आलेल्या या विमानाचे पारंपरिक जलतोफेच्या सलामीने स्वागत करण्यात आले. ‘एफएलवाय९१’च्या हिवाळी वेळापत्रकानुसार नवी मुंबईहून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि लक्षद्वीपमधील अगत्ती या चार ठिकाणी थेट हवाई सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टी आणि लक्षद्वीपमधील पर्यटन, व्यवसाय तसेच प्रादेशिक प्रवासाला चालना मिळणार आहे.
नवी मुंबई हे ‘एफएलवाय९१’ चे १४वे देशांतर्गत गंतव्यस्थान आणि महाराष्ट्रातील पाचवे ठिकाण ठरले आहे. कंपनीच्या विस्ताराच्या योजनेनुसार सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर किमतीच्या ४० एटीआर ७२-६०० विमाने आयात होणार आहेत. या विमानांची वितरण प्रक्रिया २०२७ ते २०३२ दरम्यान होणार असून, कंपनीचा ताफा ६ वरून ६० विमानांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.
-----------------------
प्रादेशिक हवाई वाहतुकीला बळ
‘एफएलवाय९१’चे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी नवी मुंबई विमानतळावरील पहिले उड्डाण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. नवी मुंबईहून चार महत्त्वाच्या गंतव्यस्थानांना जोडणी देण्यात येणार असल्याने पश्चिम भारतातील प्रादेशिक हवाई वाहतुकीला बळ मिळणार आहे. दरम्यान, नवी मुंबई विमानतळाने व्यावसायिक सेवा सुरू झाल्यापासून ३२ लाखांहून अधिक प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. सध्या सुमारे ४३ देशांतर्गत गंतव्यस्थानांना जोडणी उपलब्ध असून, आतापर्यंत २५ हजार २९५ हून अधिक व्यावसायिक विमानांचे संचालन झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.