

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील तरुणांसाठी कोतवाल पदाच्या भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सहा तालुक्यांमध्ये १११ कोतवालांची भरती केली जाणार असून, त्यासाठी आज (ता. ७)पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार असून, १५ नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल सेवक अर्थात कोतवाल पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. विशेष बाब म्हणून या भरतीला महसूल व वन विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे ठाणे, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांतील रिक्त पदे भरली जाणार आहेत. ठाणे तालुक्यात सर्वाधिक २४ जागा असून, अंबरनाथमध्ये २१ जागा आहेत. मुरबाड आणि शहापूरमध्ये प्रत्येकी १९, तर कल्याण आणि भिवंडीमध्ये प्रत्येकी १४ जागा आहेत. भिवंडी, मुरबाड आणि शहापूरमधील काही जागा पेसा क्षेत्रासाठी राखीव आहेत.
अर्जासाठी १५ दिवस
भरतीसाठी ऑनलाइन अर्ज २१ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येईल. परीक्षा शुल्क भरण्यासाठी २२ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत आहे. अर्जांची छाननी २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान केली जाणार आहे. प्रवेशपत्र ४ ते १० नोव्हेंबरदरम्यान उपलब्ध होईल.
निकालानंतर झटपट नियुक्तीपत्र
भरतीची प्रत्यक्ष परीक्षा १५ नोव्हेंबरला होणार आहे. १६ नोव्हेंबरला उत्तरसूची आणि निकाल जाहीर केला जाणार असून, १७ ते २७ नोव्हेंबरदरम्यान कागदपत्रांची पडताळणी होईल. त्यानंतर २८ नोव्हेंबरला नियुक्तीपत्रांचे वाटप करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अर्जापासून नियुक्तीपर्यंतची प्रक्रिया अवघ्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
महिलांना ३० टक्के आरक्षण
भरतीमध्ये सरकारच्या नियमानुसार विविध सामाजिक प्रवर्गांसाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे. महिलांसाठी ३० टक्के समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे. अर्ज आणि परीक्षा शुल्क thane.kotwal.org या संकेतस्थळावरूनच भरावे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.