

मुंबईकरांना ऑक्टोबरच्या उन्हाचा तडाखा
उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी थंड पेये, उद्यानांचा आधार
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका वाढल्याने मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळपासून जाणवणारी उन्हाची तीव्रता दुपारपर्यंत अधिक वाढत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळविण्यासाठी शीतपेये, सरबत, लस्सी, ताक आणि उसाच्या रसाचा आसरा घेतला आहे, तर दुसरीकडे दुपारच्या कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उद्यानांत गर्दी करीत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
गेल्या आठवडाभरापासून ऑक्टोबर हीटचा चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिक टाळत आहेत, मात्र कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना उन्हाचा सामना करावाच लागत आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री, टोपी आणि पाण्याची बाटली सोबत घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
रस्त्यावर काम करणारे मजूर, फेरीवाले, वाहतूक कर्मचारी, दुचाकीस्वार तसेच ज्येष्ठ नागरिकांना उष्णतेचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. उन्हात सतत काम करणारे मजूर आणि फेरीवाले अधूनमधून सावलीचा आधार घेताना दिसत आहेत. रस्त्यालगतची झाडे, दुकानांचे आडोसे तसेच जवळची उद्याने त्यांच्यासाठी काही काळ विश्रांतीची ठिकाणे ठरत आहेत.
उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये, यासाठी नागरिकांकडून थंड पेये आणि विविध पेयांना पसंती दिली जात आहे.
शीतपेये, सरबत, लस्सी, ताक तसेच उसाचा आणि विविध फळांचा रस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे दुपारच्या वेळेत गर्दी वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायालाही उन्हाचा काहीसा फायदा होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, दुपारच्या कडक उन्हापासून काही काळ सुटका मिळविण्यासाठी शहरातील उद्यानांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढली आहे. झाडांच्या सावलीत बसून ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुले काही काळ विश्रांती घेताना दिसत आहेत.
ऑक्टोबरमध्ये उष्णता वाढल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे. बाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
- डॉ. महादेव गारळे, शल्यचिकित्सक, केईएम रुग्णालय
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका खूप जाणवत आहे. दुपारी घराबाहेर पडणे त्रासदायक झाले आहे. त्यामुळे दुपारी उद्यानात येऊन काही वेळ झाडांच्या सावलीत बसतो. त्यामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळतो.
- संदीप चव्हाण, नागरिक
ऑक्टोबरचे ऊन यंदा चांगलेच जाणवत आहे. घरातही उकाडा जाणवत असल्याने सायंकाळी कुटुंबासह उद्यानात येतो. हिरवाई आणि मोकळ्या हवेमुळे वातावरण आल्हाददायक वाटते.
- स्मिता परब, महिला कामगार
आमचे काम उन्हातच असते. दुपारच्या वेळी उन्हाचा त्रास खूप जाणवतो आणि अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे अधूनमधून सावलीत थांबून विश्रांती घेतो आणि पाणी पितो, मात्र काम थांबवता येत नसल्याने उन्हात काम करावेच लागते.
- मुस्तफा शेख मोहम्मद, लिंबूविक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.