वाढदिवसाच्या नावाखाली सार्वजनिक जागांचे विद्रुपीकरण ...

वाढदिवसाच्या नावाखाली सार्वजनिक जागांचे विद्रुपीकरण ...
Published on: 

वाढदिवसाच्या नावाखाली सार्वजनिक जागांचे विद्रूपीकरण
कोपरखैरणे, ता. ८ (बातमीदार) : वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली तरुणांकडून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा करून परिसराचे विद्रूपीकरण करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. केक कापल्यानंतर उरलेले अवशेष, प्लॅस्टिकचे ग्लास-प्लेट्स, थर्माकोल, फुगे आणि इतर कचरा जागेवरच फेकून दिला जात असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सार्वजनिक उद्याने, मैदाने, पदपथ आणि रस्त्यांच्या कडेला वाढदिवस साजरा केल्यानंतर कचरा तसाच सोडला जातो. त्यामुळे परिसर अस्वच्छ होण्याबरोबरच नागरिकांना दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असे प्रकार वाशी सेक्टर ९ए चर्च परिसराच्या मागे, सेक्टर ६ येथील आय लव्ह वाशी पॉइंट आणि सेक्टर ६ ते सेक्टर ९ ए पर्यंतच्या सायकल ट्रॅक मार्गावर सर्रासपणे घडत असतात. यावर महापालिका प्रशासनाने वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमांनंतर कचरा न उचलणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी किंवा सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी असे उपक्रम करू नयेत आणि केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे फलक लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

भिंती, बाकांना केक व रंग लावून नुकसान
काही ठिकाणी भिंती, बाके आणि सार्वजनिक सुविधांवर केक व रंग लावून त्यांचे नुकसान केले जात असल्याचेही दिसून येत आहे.
कुणी या प्रकारांना अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास, आम्हीदेखील येथील करदाते आहोत, असे सांगून संबंधितांकडून वाद घातला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. करदाते असल्याचा अधिकार सांगताना सार्वजनिक स्वच्छता आणि मालमत्तेची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारावी, अशी अपेक्षा त्यामुळे व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com