धार्मिक प्रतिमा रस्त्यावर नको

धार्मिक प्रतिमा रस्त्यावर नको
Published on: 

देव रस्त्यावर नको
जुन्या धार्मिक वस्तूंच्या व्यवस्थापनाची मागणी
पनवेल, ता. ८ (बातमीदार) : श्रद्धा जपत असताना सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरणाचे भान राखणेही आवश्यक आहे. जुन्या धार्मिक प्रतिमा, मूर्ती, देव्हारे व पूजासाहित्य रस्त्यांच्या दुभाजकांवर, झाडांखाली, तलाव परिसरात किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी सोडण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पनवेल पालिकेने स्वतंत्र संकलन व सन्मानपूर्वक व्यवस्थापनाची व्यवस्था उभारावी, अशी मागणी श्री सखी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रतिष्ठानच्या संस्थापिका जयश्री झा सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांना याबाबत निवेदन देण्यात आले. कामोठेसह महापालिका हद्दीतील विविध भागांत जुन्या देवतांच्या प्रतिमा, मूर्ती, देव्हारे तसेच पूजासाहित्य सार्वजनिक ठिकाणी ठेवलेले आढळत असून, धार्मिक श्रद्धेशी निगडित वस्तूंची सामान्य कचऱ्याप्रमाणे विल्हेवाट लावणे योग्य नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
मात्र, श्रद्धेच्या नावाखाली धार्मिक वस्तू सार्वजनिक ठिकाणी सोडल्याने परिसर अस्वच्छ होण्याबरोबरच पर्यावरण आणि शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होतो. त्यामुळे जुन्या धार्मिक वस्तूंसाठी स्वतंत्र संकलन केंद्रे सुरू करून त्यांच्या सन्मानपूर्वक व्यवस्थापनासाठी निश्चित कार्यपद्धती तयार करावी, अशी मागणी करण्यात आली.
मंदिर संस्था, सामाजिक संस्था आणि महापालिका प्रशासनाच्या समन्वयातून ही व्यवस्था उभारावी. तसेच ‘देव रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी सोडू नका’ या आशयाची व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी सूचनाही करण्यात आली.
महापालिकेकडे सध्या अशा धार्मिक वस्तूंच्या संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याचे उपायुक्त डॉ. विधाते यांनी सांगितले, मात्र या विषयावर लवकरच विचार करून आवश्यक व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी मुक्ता घुगे, ज्योती शिरसाठ, संजीवनी तोत्रे यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com