

उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : उल्हासनगरात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यापारी आणि व्यावसायिक आस्थापनांवर आता महापालिकेचा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. शहरातील प्रत्येक व्यापारी, दुकानदार, कारखानदार आणि व्यावसायिकाला ‘ट्रेड लायसन्स’ बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांत परवाना न घेतल्यास दैनंदिन दंडासह कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
शहरातील विनापरवाना सुरू असलेल्या व्यावसायिक आस्थापनांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाने शहरव्यापी विशेष मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ३७२ ते ३८६ अन्वये शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक आणि उद्योगधंदे चालकांना अधिकृत व्यवसाय परवाना अर्थात ‘ट्रेड लायसन्स’ घेणे बंधनकारक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण आणि उपायुक्त स्नेहा करपे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शहरातील आस्थापनांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.
नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांत आवश्यक कागदपत्रांसह नागरी सुविधा केंद्रात अर्ज करून निर्धारित शुल्क भरत परवाना घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधार, पॅन कार्ड, मालकी अथवा भाडेकरार कागदपत्रे, मालमत्ता कर पावती, जीएसटी व गुमास्ता प्रमाणपत्रासह व्यवसायानुसार आवश्यक दाखले सादर करावे लागणार आहेत. मुदतीत परवाना न घेणाऱ्या आस्थापनांवर दैनंदिन दंडात्मक तसेच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा विभागप्रमुख विनोद केणे यांनी दिला आहे.
शहरातील प्रत्येक व्यवसाय नियमानुसार आणि अधिकृत परवान्याने चालावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. व्यापाऱ्यांना त्रास देणे नव्हे, तर व्यवसाय व्यवस्थेत शिस्त आणि पारदर्शकता आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांत व्यापाऱ्यांनी ट्रेड लायसन्स घ्यावे. अन्यथा नियमानुसार दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- विनोद केणे, विभागप्रमुख, उल्हासनगर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.