ऑनलाइन प्रक्रिया ठप्प

ऑनलाइन प्रक्रिया ठप्प
Published on: 

भाडेकरू नोंदणीची वेबसाइट बंद
घरमालक त्रस्त
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई पोलिसांकडे भाडेकरूंची माहिती नोंदवण्यासाठी असलेली ऑनलाइन वेबसाइट गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने घरमालकांची गैरसोय होत आहे. वेबसाइटवर माहिती भरल्यानंतर ती सबमिट होत नसल्याने तसेच प्रिंट मिळत नसल्याने भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्यायची कशी, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक अडचण तातडीने दूर करून ऑनलाइन सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
नवी मुंबईत अनेक नागरिक आपली घरे भाड्याने देतात. अशा वेळी भाडेकरूंची आवश्यक माहिती पोलिसांना सादर करणे महत्त्वाचे असते. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध असले, तरी वेळ आणि खर्च वाचत असल्याने अनेक घरमालक ऑनलाइन प्रक्रियेला प्राधान्य देतात, मात्र वेबसाइट बंद असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत.
ऑफलाइन पद्धतीने माहिती सादर करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यात जावे लागते. अधिकारी उपलब्ध नसणे, कामाचा ताण किंवा प्रशासकीय कारणांमुळे काही वेळा वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाढतो. नोकरी-व्यवसायात व्यस्त असलेल्या घरमालकांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे.

पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी
भाडेकरूंची माहिती वेळेत सादर करण्याची तयारी असूनही वेबसाइटमधील तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया रखडत असेल, तर नागरिकांनी काय करावे, असा सवाल उपस्थित होत आहे. वेबसाइट बंद असल्यामुळे माहिती सादर करण्यास विलंब झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही घरमालकांकडून विचारला जात आहे. पोलिसांनी वेबसाइटमधील तांत्रिक दोष तातडीने दूर करावेत. ऑनलाइन सेवा पूर्ववत होईपर्यंत माहिती सादर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देऊन नागरिकांना स्पष्ट मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com