महालक्ष्मी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज

महालक्ष्मी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज
Published on: 

महालक्ष्मी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज
भाविकांसाठी मंडप, पिण्याचे पाणी, विशेष बससेवा; सुरक्षेसाठी ७७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
मुंबई, ता. ९ : देशभरात नवरात्रोत्‍सवाची तयारी जोरदार सुरू असताना मुंबईतील महालक्ष्मी मंदिरातदेखील तयारी पूर्ण झाली आहे.
मुंबईची आराध्य देवता असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात परंपरेनुसार शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. देवीचे अनेक भक्त या कालावधीमध्ये मंदिरात दर्शनासाठी येतात. यावर्षी देखील मंदिराने भक्तांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
महालक्ष्मी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने भुलाभाई देसाई मार्गावरील शोभा हॉटेल ते शीतल स्टोअरपर्यंत मंडप उभारणी केली आहे. तसेच रांगेत असणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या उत्सव काळात सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी गावदेवी पोलिस ठाण्यावर असून, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ताडदेव वाहतूक विभाग यांच्याकडे आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला सुरक्षा व्यवस्थेच्या अधीन राहून मेटल डिटेक्टरमधूनच प्रवेश करणे आवश्यक असून, त्यांच्याकडे असलेल्या सर्व वस्तू व बॅग, पर्स या स्कॅनरमधून स्कॅन करून घेणे आवश्यक असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. उत्सव काळात मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी भायखळा, मुंबई सेन्ट्रल तसेच दादर येथून विशेष बसेसची सोय बेस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
पोलिसांव्यतिरिक्त अग्निशमन दल, मंदिराचे सेवेकरी, वैष्णव ट्रस्ट तसेच अनिरुद्ध बापू यांच्या संस्थेचे सेवेकरी भाविकांच्या सोयीसाठी उत्सव काळात तत्पर असणार आहेत. या काळात भाविकांसाठी रांगेची व्यवस्था करतानाच मंदिरासह लगतच्या परिसरातील संशयास्पद हालीचालीवर लक्ष ठेवण्यासोबतच महिलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ७७ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे संशयास्पद हालचालींवर नजर, चोरी, खिसेकापू किंवा अन्य त्रासदायक वर्तन यावर त्वरित कारवाई करता येईल.
उत्सव काळात श्रींच्या पूजेनंतर श्री महालक्ष्मी मंदिर दर्शनासाठी दररोज सकाळी ५.३० वाजता उघडणार असून, रात्री ११ वाजता बंद होईल. सकाळी ७ ते ७.३० वाजेपर्यंत आरतीसाठी, दुपारच्या नैवेद्यासाठी १२.०० ते १२.२० पर्यंत, सायंकाळची धुपारती ०६.३० ते ०६.४० वाजेपर्यंत, त्यानंतर सायंकाळच्या आरतीसाठी ०७.३० ते ०८.०० या काळात मंदिर गाभारा दर्शनासाठी बंद राहील तसेच आरती व नैवेद्याच्या तयारीकरिता मंदिर १० मिनिटे अगोदर बंद करण्यात येईल, असे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

डॉक्‍टरांचे पथक
मंदिरामध्ये डॉक्टरांचे पथक सज्ज असून, प्रथमोपचार पेटीची तसेच रुग्णवाहिकेची व्यवस्थाही मंदिर प्रशासनाने केली आहे. तसेच मंदिर परिसरात भाविकांसाठी बृहन्मुंबई महापालिकेने सुलभ शौचालयाचीदेखील सोय करून दिली आहे. तसेच पादत्राणे ठेवण्याची व्यवस्थाही मंदिराच्या परिसरात मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com