पूर्णेकर हत्याकांड : पप्प्या शिंदेच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ

पूर्णेकर हत्याकांड : पप्प्या शिंदेच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ
Published on: 

पूर्णेकर हत्याकांड

पप्प्या शिंदेच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ
शस्त्रे पुरवल्याचा पोलिसांचा संशय; टल्लीला मोबाईल दिल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपी सुभाष शिंदे उर्फ पप्प्या शिंदे याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने तीन दिवसांची वाढ केली आहे. त्याला १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्येसाठी वापरलेली दोन पिस्तुले आणि तीन चॉपर कोणी उपलब्ध करून दिले, तसेच फरार आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याच्याशी संपर्कासाठी वापरलेल्या मोबाईलची खरेदी कोणी केली, याचा तपास पोलिसांना करायचा आहे. पप्प्या शिंदे यानेच शस्त्रांची व्यवस्था केली आणि टल्लीला दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर मोबाईल खरेदी करून दिला, असा पोलिसांचा दावा आहे.

पप्प्या शिंदे याची पोलिस कोठडी शुक्रवारी (ता. ९) संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी पोलिसांनी कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ देण्याची मागणी केली. फरार आरोपी टल्ली आणि हत्याकांडातील हेल्मेटधारी संशयिताच्या ठावठिकाणाबाबत पप्प्या शिंदेकडे चौकशी केली असता तो माहिती देत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांच्या ठावठिकाणाबाबत त्याला माहिती असण्याची शक्यता असल्याने अधिक तपासासाठी कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
हत्येच्या कटाची पूर्वतयारी म्हणून गुन्ह्यानंतर संपर्कात राहण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर मोबाईल आणि सिम कार्ड खरेदी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. हा मोबाईल टल्ली याला दिल्याची माहिती आहे. मोबाईल खरेदीमागील भूमिका आणि आरोपींमधील संपर्कांची साखळी उलगडण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
दरम्यान, पूर्णेकर यांच्या हत्येसाठी दोन पिस्तुले आणि तीन चॉपरचा वापर झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या शस्त्रांची व्यवस्था पप्प्या शिंदे यानेच केल्याची माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे, मात्र शस्त्रे कुठून आणली, ती कोणी उपलब्ध करून दिली आणि गुन्ह्यानंतर कुठे लपवली, याचा शोध अद्याप घ्यायचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या सर्व बाबींच्या तपासासाठी पप्प्या शिंदेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली.
--------------
‘आरोप असलेल्यांचे काय?’
पप्प्या शिंदेच्या वकिलांनी न्यायालयात बचावाची बाजू मांडताना पुरवणी जबाबात आरोप करण्यात आलेल्या अन्य दोन व्यक्तींच्या भूमिकेचा मुद्दा उपस्थित केला. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असे उद्गार काढत त्यांनी तपासातील कथित विसंगतींकडे लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com