

चिकन बिर्याणीवरून
आरोपीचा पोलिसांवर हल्ला
वैद्यकीय तपासणीवरून परतताना ब्लेडने स्वतःसह दोन पोलिसांवर वार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : चिकन बिर्याणी देण्याची मागणी पूर्ण न केल्याने एका आरोपीने थेट पोलिसांवरच वार केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली.
वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहात परतताना आरोपीने गोंधळ घालत लपवून आणलेल्या ब्लेडने स्वतःची मान आणि हातावर वार केले. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगठ्यांवरही त्याने वार करून त्यांना जखमी केले. फैजल जमील अहमद शेख (३५) असे आरोपीचे नाव आहे.
आधारवाडी कारागृहातील सात पुरुष आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी बुधवारी (ता. ७) ठाणे सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले होते. तपासणी पूर्ण झाल्यानंतर दुपारी त्यांना शासकीय वाहनातून परत नेण्याची तयारी सुरू होती. त्या वेळी फैजल याने मित्र येईपर्यंत थांबण्याची आणि चिकन बिर्याणी देण्याची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास गोंधळ घालण्याची धमकी देत त्याने वाहनात बसण्यास नकार दिला.
पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने तोंडात लपवून ठेवलेले ब्लेड काढून स्वतःला जखमी केले. त्याला रोखण्यासाठी पुढे आलेल्या पोलिस कर्मचारी काशिकर आणि आरगडे यांच्या अंगठ्यांवरही त्याने ब्लेडने वार केले. झटापटीत ब्लेड फेकून दिल्यानंतर जखमी आरोपी आणि दोन्ही पोलिसांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश खुमकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.