रक्तक्षय निदानासाठी स्वस्त तंत्रज्ञान

रक्तक्षय निदानासाठी स्वस्त तंत्रज्ञान
Published on: 

रक्तक्षय निदानासाठी स्वस्त तंत्रज्ञान
रक्ताची भौतिकशास्त्रीय चाचणी; आयआयटी मुंबईच्या संशोधकांचे संशोधन

मुंबई, ता. २३ : ॲनिमिया (रक्तक्षय) आणि सिकल सेल या आजारांचे निदान करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी रक्ताच्या भौतिक गुणधर्मांवर आधारित किफायतशीर तंत्रज्ञान विकसित केले आहे. रक्ताचा थेंब काचेच्या पट्टीवर किती अंतरापर्यंत पसरतो आणि ऑक्सिजन कमी केल्यानंतर त्यात किती बदल होतो, याच्या आधारे या आजारांचे निदान करता येते. यासाठी महागड्या प्रयोगशाळा आणि विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता नसल्याने ग्रामीण व दुर्गम भागांतील आरोग्यसेवेसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.

आयआयटी मुंबईच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागातील प्रा. महेश तिरुमकुवुलू यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने हे उपकरण विकसित केले आहे. या संशोधनाचा शोधनिबंध ‘लॅब ऑन अ चिप’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. रक्ताची श्यानता अर्थात दाटपणा मोजण्यासाठी संशोधकांनी रक्ताचा एकसमान थर तयार करणारे स्वयंचलित उपकरण विकसित केले. ॲनिमियाच्या निदानासाठी ५१६ व्यक्तींच्या रक्तनमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यात ॲनिमिया असलेल्या ९५.१ टक्के व्यक्तींची, तर ॲनिमिया नसलेल्या ८६.९ टक्के व्यक्तींची योग्य ओळख पटली. याशिवाय रक्ताच्या सुकलेल्या थराच्या रंगावरून हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजणारी प्रतिमाआधारित पद्धतही विकसित करण्यात आली. एक हजाराहून अधिक रुग्णांवरील चाचण्यांत हिमोग्लोबिनचे प्रमाण सुमारे ०.५ ग्रॅम प्रति डेसिलिटर इतक्या अचूकतेने यामध्ये मोजता आले.

सिकल सेलचीही तपासणी
सिकल सेलच्या निदानासाठी रक्तातील ऑक्सिजन कमी करण्यापूर्वी आणि नंतर रक्ताच्या पसरण्यात होणारा बदल मोजण्यात आला. महाराष्ट्र आणि मध्य भारतातील आदिवासी भागांतील ३९४ व्यक्तींवर केलेल्या चाचण्यांत सुमारे ९५ टक्के बाधित व्यक्ती आणि ९५ टक्के निरोगी व्यक्ती अचूकपणे ओळखता आल्या. सिकल सेलवरील हायड्रॉक्सियुरिया या औषधाचा परिणाम तपासण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे उपचारांना मिळणारा प्रतिसाद जाणून घेण्यास मदत होणार आहे.

व्यावसायिक उत्पादनाची तयारी
मोजकी आणि स्वस्त साधने या चाचणीसाठी आवश्यक आहेत. मात्र, काही आनुवंशिक घटक व इतर आजारांमुळे निदानात मर्यादा येऊ शकतात. या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक उत्पादनासाठी आयआयटी मुंबईच्या ‘रिओहीम प्रायव्हेट लिमिटेड’ या नवउद्योगाला परवाना देण्यात आला आहे. तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी मिळवण्याच्या दृष्टीने संशोधकांचे पथक जबलपूर येथील राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन संस्था आणि नागपूरच्या एम्ससोबत काम करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com