

सहा वर्षांच्या मुलीला शाळेत पुन्हा प्रवेश द्या
आरटीई प्रवेशाप्रकरणी दादरस्थित शाळेला उच्च न्यायालयाचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईसारख्या शहरात, विशेषतः मुलीला इतर कोणत्याही खासगी विनाअनुदानित शाळेत प्रवेश मिळण्याची शक्यताही कमी झाल्याच्या परिस्थितीत अंतराचा निकष अत्यंत अचूकतेने लागू करता येणार नाही. आरटीईअंतर्गत अंतराच्या मर्यादेबाबत अत्यंत कठोर दृष्टिकोन ठेवणे हे मोफत आणि अनिवार्य शिक्षणाच्या घटनात्मक अधिकारावर गदा आणण्यासारखे असल्याचे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. एका सहा वर्षांच्या गरजू मुलीला दादरस्थित खासगी शाळेत आरटीईअंतर्गत प्रवेश नाकारणारा राज्य सरकारचा आदेश रद्द केला आणि मुलीला पुन्हा प्रवेश देण्याचे आदेश शाळेला दिले.
दादरस्थित बालमोहन विद्यामंदिर शाळेला एका आठवड्यात संबंधित मुलीला इयत्ता पहिलीत प्रवेश देण्याचे आदेश न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने दिले. दुसरीकडे आरटीई कायद्यांतर्गत विविध राज्यांनी तयार केलेल्या नियमांमध्ये लोकसंख्येची घनता, साक्षरतेचे प्रमाण आणि शाळेची गरज यासारख्या घटकांच्या आधारे अंतराचे निकष ठरवण्यात आले आहेत. आजच्या काळात वेळ आणि अवकाशाचे अंतर कमी झाले आहे, तिथे अंतर हा प्रवेशासाठी एक कठोर अडथळा उरत नाही. दोन ठिकाणांमधील सर्वात मोठे अंतर म्हणजे वेळ मानले जाते. त्यामुळे मुंबईत ‘शिक्षण हक्क कायद्या’तील (आरटीई) ‘परिसरातील शाळा’ ही संकल्पना अत्यंत कठोर आणि संकुचित अर्थाने लावता येणार नाही, असेही महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
शाळा आणि घर यांच्यातील अंतराच्या निकषांचे उल्लंघन झाल्याचे कारण देत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (ईडब्ल्यूएस) २५ टक्के आरटीई कोट्यातून त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला बालमोहन विद्यामंदिर शाळेत मिळालेला प्रवेश रद्द करण्यात आला. त्यांचे घर शाळेपासून निर्धारित एक किमी अंतरापेक्षा जास्त दूर आहे, असे कारण प्रवेश रद्द करण्यासाठी दिले गेले होते. शिक्षण उपसंचालकांनीही शाळेचा हा निर्णय योग्य ठरवला. त्याला वरळीत राहणाऱ्या ३८ वर्षांच्या करुणा कांबळे यांनी उच्च न्यायालायात आव्हान दिले होते. शाळेपासून एक ते तीन किमी अंतरावर घरे असलेल्या दोन मुलांना शाळेने प्रवेश दिला होता. मात्र, शिक्षण निरीक्षकांच्या अहवालात आपले घर शाळेपासून चार किमी अंतरावर असल्याचे म्हटले आणि त्याआधारे शिक्षण उपसंचालकांनी आपल्या मुलीचा प्रवेश रद्द केल्याचा दावा याचिकेत केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.