दुष्काळ निवारणासाठी सहस्रचंडी महायाग

दुष्काळ निवारणासाठी सहस्रचंडी महायाग
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकरी सुखी व्हावेत, शेती-बागायतींना नवसंजीवनी मिळावी आणि महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा, या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नवकुंडात्मक सहस्रचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होणारा रासरंग दांडिया उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वेदमूर्ती रवींद्र पाठक यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ११) सकाळी ११ वाजता महायागाला प्रारंभ होईल. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत घटस्थापना आणि सप्तशती पाठवाचन होणार आहे. या उत्सवादरम्यान दररोज ७२ जोडप्यांच्या उपस्थितीत महापूजेचे आयोजन केले आहे. उत्सवाच्या नऊ दिवसांत देवीची महापूजा, सप्तशती पाठवाचन, होमहवन, अर्चना, सांजआरती आणि महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याविषयी माहिती देण्यासाठी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राजेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नवरात्रोत्सवाचा सांस्कृतिक प्रारंभ रविवारी सायंकाळी सात वाजता गायक राहुल देशपांडे यांच्या संगीत मैफलीने होणार आहे. शास्त्रीय आणि भक्तिसंगीताचा सुरेल अनुभव या मैफलीतून रसिकांना घेता येणार आहे. सोमवारी (ता. १२) ह.भ.प. चेतन महाराज यांचा हरिपाठ व कीर्तन, मंगळवारी (ता. १३) माता की चौकी, बुधवारी (ता. १४) महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, तर गुरुवारी (ता. १५) महिला भोंडला आणि सारेगमपच्या कलावंतांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (ता. १६) महिषासुरमर्दिनी नाट्यविष्कार, शनिवारी (ता. १७) भजन मेळावा, रविवारी (ता. १८) नंदेश उमप यांचा ‘जागर देवीचा’ आणि सोमवारी (ता. १९) ‘दि फोक मराठी’ व पारंपरिक गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार मोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com