

Amey Wagh Biography
esakal
आशिष पाथरे - sakal.avtaran@gmail.com
प्रायोगिक नाटकांपासून मालिका, जाहिराती आणि सिनेमापर्यंतचा, अभिनेता अमेय वाघचा प्रवास म्हणजे सतत स्वतःला शोधत, घडवत जाण्याची गोष्ट. अभिनयाची भूक, प्रयोगशीलतेची ओढ आणि ‘फोकस ध्येयावर’ सूत्र जोपासत अमेयने स्वतःची वेगळी वाट निर्माण केली आहे. त्याच्याच प्रवासाची ही गोष्ट...
त्याक्षितिजाच्या पल्याड जाताना एक आभाळ लागतं... कष्टाचं, स्वप्नांचं, तारांकित दुनियेतल्या चमचमत्या अस्तित्वासोबत एक सर्जक म्हणून स्वतःला घडवण्याच्या प्रोसेसचं... त्या आभाळात क्षणभर का होईना स्थिरावायचंय मला... माझ्यातला मी सापडेपर्यंत.
वाटतंय ना प्रायोगिक नाटकातलं वेगळ्या वाटेवरचं वाक्य? पण खरं तर हेच आहे अमेय वाघच्या मनोरंजन क्षेत्रातल्या आतापावेतोच्या वाटचालीचं सूत्र. म्हणून तर, एकीकडे प्रायोगिक नाटक, संगीत नाटक; तर दुसरीकडे ॲड, मालिका आणि सिनेमा अशा रोलर कोस्टर राईडसारखा सुरू आहे त्याचा अभिनय प्रवास... कसा तो पाहूया.
पुण्यात प्रचंड डोंगरतोड झाली, जंगलं लुप्त झाली... गुहा नामशेष झाल्यामुळे पाच बिल्डिंगमध्ये ६८ वाघ राहायचे... जोक्स अपार्ट, वाघांच्या या एवढ्या मोठ्या एकत्र कुटुंबात अमेयचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. घरात दूरदूरपर्यंत अभिनयाची परंपरा नाही... इतर बंधू फार फार तर हौसेने खेळाडू आणि पेशाने इंजिनिअर. त्या काळी क्रेझ असलेल्या एमबीएवरसुद्धा घरातल्यांचा डोळा.