

The art of balancing life
esakal
नदीम काझी
क्षणभर विचार करा, एखादं झाड किती उंच वाढू शकतं? उत्तर सोपं आहे - झाडाला जितकं शक्य आहे तितकंच उंच वाढतं! म्हणूनच आपण झाडं म्हातारी होताहेत असं कधीच म्हणत नाही, ती ‘वाढत आहेत’ असंच म्हणतो. पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव सर्वोत्तम होण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतो, फक्त अनेकदा माणूसच याला अपवाद ठरतो. आपल्या क्षमतेपेक्षा कमीवर समाधान मानू नका, ती खरंच अमर्याद आहे.
प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत अशी एक श्रद्धा आहे, की एखादी आत्मा स्वर्गात पोहोचल्यावर त्याला दोन साधे पण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात :
१. तुम्ही आनंद दिलात का?
२. तुम्हाला आनंद सापडला का?
मानवी जीवन म्हणजे समाधानी मन आणि अंतर्मनातली जाज्ज्वल्य ऊर्मी यांच्यातलं एक अखंड नृत्य आहे. आपल्याकडे जे आहे त्याचा समाधानी आनंद आणि जे हवं आहे त्याची असमाधानी ओढ, ‘पुरेसं आहे’ ही जाणीव आणि ‘आणखी हवं’ ही इच्छा; आपल्याला परिपूर्णपणे जगायचं असेल, तर या दोन्ही गोष्टी स्वीकारणं गरजेचं आहे. आपल्याजवळ जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगणं आणि आणखी काही साध्य करण्याची इच्छाही बाळगणं. अर्थातच या दोन्हीत संतुलन हवं, कारण संतुलनच सर्व काही आहे!
काहीजण आयुष्य खूपच आरामात जगत असतात. त्यांची फारशी वाढ होत नाही. आयुष्याच्या एका टप्प्यावर ते स्थिरावतात, त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये जातात. पण खरी वाढ नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेरच होत असते. याउलट, काही लोक सतत काहीतरी साध्य करण्याच्या मागे लागलेले असतात. एक ध्येय पूर्ण झालं की लगेच पुढचं लक्ष्य ठरवतात. पुढच्या प्रवासासाठी दिशा ठरवणं योग्यच आहे, पण आपल्या यशाचा आनंद साजरा करणं आणि आपण ते साध्य करू शकलोय याबद्दल कृतज्ञ राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे समजवताना मला एका सुंदर वाक्याची आठवण आली, ‘जिथं हास्याचा अंश असतो, तिथं यशाचा अंशही असतो.’
आठवतंय? काही वर्षांपूर्वी ‘बकेट लिस्ट’ ही संकल्पना केवढी लोकप्रिय झाली होती! तेव्हा जवळपास सगळ्यांनीच आयुष्यात एकदातरी करायच्या गोष्टींची यादी केली. पण आपलं आयुष्य फक्त त्या यादीतल्या गोष्टी पूर्ण करण्यापुरतं मर्यादित नसतं; ते आयुष्याच्या ‘बकेट’मध्ये आनंद, हसू, समाधान आणि आठवणी भरून काढण्यासाठीही असतं, हे लक्षात घ्यायला हवं.