

Progressive Ideas in the Sant Tradition
esakal
डॉ. रवींद्र शोभणे
भारतीय संतपरंपरेकडे एक कटाक्ष टाकला, तरी त्या सगळ्या संतांच्या काव्यात आणि कार्यात हीच पुरोगामी, समाजोपयोगी अशी भूमिका असल्याचे जाणवते. भोंदूबुवा, खोटे साधू-जोगी सोडले तर या संत परंपरेतील कोणताही संत कधीही समाजातील अंधश्रद्धेचे, नरबळीचे, पशुबळीचे, चातुर्वणाचे, जातीभेदाचे समर्थन करणारा नव्हता. मग त्यांनी सगुण भक्तीची कास धरलेली असो की निर्गुण भक्तीचा स्वीकार केलेला असो, त्यांची दृष्टी काळाच्या पुढे जाणारी होती.
संत नामदेवांनी तेराव्या-चौदाव्या शतकात केलेली काव्यनिर्मिती मराठी काव्याच्या उगमस्थानी आहे, हे निर्विवाद वास्तव आहेच. हे साहित्य किंवा काव्य केवळ त्या काळापुरतेच सीमित राहिले आहे का? किंवा केवळ संत साहित्य म्हणूनच मर्यादित राहिले आहे का? याचा विचार केला तर या साहित्याने किंवा काव्याने भारतीय साहित्याचा पाया घातला, एत्तदेशीय साहित्यविश्वाचा कणा म्हणून हे काव्य उभे राहिले, हे नाकारता येत नाही. कारण तेव्हापासून सुरू झालेला हा काव्याचा प्रवास (नंतर इतरही साहित्य प्रकारांच्या बाबतीत) सातत्यपूर्ण सुरू राहिला. त्याने एक परंपरा निर्माण केली. ही परंपरा केवळ मध्ययुगीन काळापुरतीच सीमित न राहता काळाच्या बदलत्या परिमाणांतसुद्धा ती उत्क्रांत होत गेली.