

Chikankari Embroidery
esakal
वर्षा गजेंद्रगडकर
चिकनकारी भरतकामात वापरल्या जाणाऱ्या प्रतिमा मुख्यतः निसर्गाशी जोडलेल्या असतात. वेली, फुलं, आंबे, कमळ याखेरीज, हत्ती, मोर, पोपट आणि भौमितिक आकृत्यांचाही वापर केला जातो. भरतकामाला पोत, खोली आणि शॅडो देण्यासाठी एकूण ३६ प्रकारचे टाके चिकनकारी भरतकामात वापरले जातात.
आक्रमण करून ताब्यात घेतलेले प्रदेश असोत, वेगवेगळ्या कारणांमुळे झालेलं माणसांचं स्थलांतर असो किंवा व्यापार-उदिमामुळे आलेला दीर्घकालीन संपर्क असो, दोन संस्कृती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा सामाजिक व भावनिक पडझड होते. आर्थिक उलथापालथही होते. पण त्याचवेळी अनेकदा खालच्या सूक्ष्म स्तरांत, नकळत का होईना, पण सांस्कृतिक देवघेवही होत असते. वेशभूषा, दागिने, पाककृतींपासून पुष्कळ गोष्टी परस्परांकडून स्वीकारल्या आणि दिल्याही जातात. भारतातल्या कितीतरी हस्तकला अशा सांस्कृतिक देवाणघेवाणींतून जन्मल्या आहेत आणि भारतीय मूळ असलेल्या अनेक कलाही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत.
काही कलांच्या उगमाचा निश्चित ठावठिकाणा किंवा पुरावा नसल्यामुळे इतिहासात बऱ्याचदा वेगवेगळ्या कथांची नोंद होते. लखनौमधली प्रसिद्ध चिकनकारी कला अशीच एक वलयांकित हस्तकला आहे. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात भारतात आलेल्या मेगास्थेनीस या ग्रीक प्रवासी आणि इतिहासकारानं भारतीय लोकांनी परिधान केलेल्या, फुलांची सुंदर नक्षी असलेल्या, शुभ्र पांढऱ्या मलमलच्या कपड्यांची नोंद केली आहे. हा चिकनकारी भरतकामाचा पहिला लिखित पुरावा मानला जातो. एक कथा सांगते, की कुणी एक प्रवासी लखनौमधल्या एका लहान गावातून प्रवास करत असताना त्याला खूप तहान लागली. त्यानं वाटेत थांबून एका शेतकऱ्याकडे पाणी मागितलं. शेतकरी गरीब होता, तरीही त्यानं या आगंतुक पाहुण्याचं मनापासून आदरातिथ्य केलं. यामुळे भारावून गेलेल्या प्रवाशानं त्याला चिकनकारी भरतकाम शिकवलं आणि ‘ही कला तुला काहीही कमी पडू देणार नाही’, असं सांगून तो निघून गेला. तिथून या कलेचा विस्तार होत गेला, असं म्हणतात. आणखी एका कथेनुसार, सतराव्या शतकातल्या मुघल सम्राट जहांगिराची पत्नी नूर जहाँ चिकनकारी भरतकामात निपुण होती म्हणे. तिच्या शुभ्रधवल कपड्यांवरचं हातानं केलेलं नक्षीकाम बघून जहांगीर बेहद्द खूश झाला आणि त्यानं या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी शाही ‘वर्कशॉप्स’ प्रस्थापित केली. पर्शियातून कलाकारांना बोलावून नूर जहाँनं या कलेत आणखी अचूकता आणि व्यावसायिकता आणली, असं म्हणतात.