

Changing Pattern of Maharashtra Drought
esakal
महाराष्ट्रात दुष्काळ हा केवळ पाऊस कमी पडण्याचा प्रश्न राहिलेला नाही. पाऊस पडतो; पण तो कधी, किती आणि किती वेळात पडतो, यावर शेतीचे भवितव्य अधिकाधिक अवलंबून राहू लागले आहे. एका भागात अतिवृष्टी, तर दुसऱ्या भागात पावसाचा खंड, काही दिवस मुसळधार पाऊस आणि त्यानंतर दीर्घकाळ कोरडे वातावरण, अशी विस्कळित पावसाची रचना राज्याच्या शेतीसमोर नवे आव्हान उभे करत आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेमुळे हा प्रश्न अधिक गंभीर आहे. राज्याच्या सुमारे ४० टक्के क्षेत्राला दुष्काळाचा धोका असल्याचे महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण नमूद करते. राज्यातील पर्जन्यमानही अत्यंत विषम असून, वार्षिक पाऊस ४०० ते ६००० मिलिमीटरपर्यंत बदलतो. सध्याच्या स्थितीत आणखी एक विरोधाभास दिसतो. ‘दुष्काळ’ आणि ‘अतिवृष्टी’ हे आता परस्परविरोधी शब्द राहिलेले नाहीत. एखाद्या हंगामात पावसाचे एकूण प्रमाण समाधानकारक असले तरी पिकाच्या गरजेच्या काळात पाऊस न पडणे, तर काढणीच्या काळात अचानक मुसळधार पाऊस पडणे, यामुळे शेतकऱ्याचे अर्थकारण कोलमडू शकते.
या पार्श्वभूमीवर एल निनोकडे गांभीर्याने पाहावे लागेल. जागतिक हवामान संघटनेच्या सप्टेंबर २०२६च्या अंदाजानुसार एल निनो आता स्पष्टपणे सक्रिय झाले असून, तो पुढील काही महिन्यांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत तो कायम राहण्याची शक्यता जवळपास १०० टक्के असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. मात्र एल निनो म्हणजे महाराष्ट्रात हमखास दुष्काळ, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. त्याचा परिणाम प्रदेश, हंगाम आणि इतर महासागरीय-वातावरणीय घटकांनुसार बदलतो. त्यामुळे ‘एल निनो आला म्हणजे पाऊस गेला’ या सोप्या समीकरणाऐवजी, त्यातून पावसाच्या वितरणात आणि तापमानात होऊ शकणारे बदल लक्षात घेणे आवश्यक आहे.