मिशन मौसमअंतर्गत वनामकृवित उभारणार अत्याधुनिक एकात्मिक हवामान निरीक्षण प्रणाली

मिशन मौसमअंतर्गत वनामकृवित उभारणार अत्याधुनिक एकात्मिक हवामान निरीक्षण प्रणाली
Published on: 

‘वनामकृवि’त उभारणार
अत्याधुनिक हवामान निरीक्षण प्रणाली

भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि ‘वनामकृवि’ यांच्यात करार

ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी : मराठवाड्यातील हवामान निरीक्षण, अचूक हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी कृषी हवामान सल्ला सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई येथील भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यात केंद्र शासनाच्या ‘मिशन मौसम’ उपक्रमांतर्गत एकात्मिक हवामान निरीक्षण प्रणाली उभारणीसाठी शुक्रवारी (ता. १६) सामंजस्य करार करण्यात आला.
ही अत्याधुनिक प्रणाली विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प येथे उभारण्यात येणार आहे. याअंतर्गत सी-बँड पोलॅरिमेट्रिक डॉप्लर हवामान रडार, मानक हवामान उपकरणांनी सुसज्ज पृष्ठभागीय हवामान वेधशाळा आणि रेडिओसॉन्ड वेधशाळा या तीन महत्त्वपूर्ण सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. रेडिओसॉन्ड प्रणालीद्वारे हवामान फुग्याच्या साह्याने वातावरणाच्या उच्च स्तरांवरील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा यांसारख्या हवामानविषयक घटकांची निरीक्षणे घेता येतील.
या सामंजस्य करारप्रसंगी कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा आणि मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख तथा वैज्ञानिक बिक्रम सिंह, विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे, भारतीय हवामानशास्त्र विभागातील शंभू रवींद्रन, महेश बुरटे आदी उपस्थित होते.
डॉ. इंद्र मणी मिश्रा म्हणाले, की या प्रणालीमुळे हवामानविषयक निरीक्षणांची वैज्ञानिक क्षमता वाढेल. तसेच हवामानातील बदलांचे अधिक प्रभावी विश्लेषण करून शेतीसह विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त हवामान आधारित सेवा विकसित करण्यास मदत होईल. बिक्रम सिंह यांनी वनामकृवि येथे उभारण्यात येणारी एकात्मिक हवामान निरीक्षण प्रणाली ही वैशिष्ट्यपूर्ण सुविधा ठरेल, असे सांगितले. या केंद्रामार्फत हवामान निरीक्षण, माहिती संकलन व विश्लेषण आणि हवामान अंदाज निर्मिती यांना चालना मिळण्यासोबतच भविष्यात देशातील अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी हे केंद्र संदर्भ व मार्गदर्शन केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना वेळेवर,
अधिक सल्ला मिळण्यास मदत
हवामानातील अनिश्चितता, पावसाचे बदलते स्वरूप आणि अवकाळी पाऊस यांसारख्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही प्रणाली मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हवामानविषयक अधिक व्यापक निरीक्षणे आणि त्यांचे शास्त्रीय विश्लेषण यांमुळे पेरणी, सिंचन, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच काढणी यांसारख्या कृषी कामांचे नियोजन करण्यासाठी अधिक उपयुक्त हवामान आधारित सल्ला सेवा विकसित करण्यास मदत होईल. परिणामी, हवामान बदलांशी जुळवून घेणाऱ्या आणि जोखीम कमी करणाऱ्या शेती पद्धती विकसित करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल.

फोटो :
परभणी : मुंबई येथील भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, वैज्ञानिक बिक्रम सिंह, डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. कैलास डाखोरे, शंभू रवींद्रन, महेश बुरटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com