पुण्यातील रस्त्यांसाठी ‘एआय’चा वापर सायकल स्पर्धेसाठी उपयोग होणार ः राज्यातील पहिला प्रयोग

पुण्यातील रस्त्यांसाठी ‘एआय’चा वापर
सायकल स्पर्धेसाठी उपयोग होणार ः राज्यातील पहिला प्रयोग
Published on: 

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २३ ः पुण्यातील सायकल स्पर्धेसाठी तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यासाठी पहिल्यादांच ‘एआय’ची (कृत्रिम बुद्धिमत्ता मदत घेतली जाणार आहे. रस्त्याच्या रुंदीकरणापासून, रस्त्याचा दर्जा व मार्गातील संभाव्य अपघातप्रवण क्षेत्र आदी विविध कारणांसाठी ‘एआय’ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘पुणे ग्रँड टूर’साठी ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जात आहेत. त्या रस्त्याच्या कामासाठी ‘एआय’चा वापर केला जात आहे. यासाठी सुमारे चाळीस लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
मलेशिया येथील ‘होनाई’ या संस्थेची यासाठी मदत घेतली जात आहे. सध्याच्या पारंपरिक पद्धतीच्या माध्यमातून रस्त्याचे सर्वेक्षण न करता ‘मल्टी-मोड सर्वेक्षण’च्या माध्यमातून रस्त्याची माहिती घेतली जात आहे. यात ड्रोन आणि वाहनांवर बसवलेले कॅमेरे यांसारख्या विविध माध्यमांतून रस्त्यांची पाहणी सुरु आहे. आतापर्यंत पुण्यातील १०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची माहिती संकलित केली आहे. या डेटाचे क्लाउड-आधारित डॅशबोर्डवर अचूक विश्लेषण केले जाईल. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे, रस्त्याचे थर देखील शोधण्यात मदत होणार आहे.
------------------
हे तंत्रज्ञान कसे काम करते ?
‘होनाई’चे ‘रोड अथेना’ हे तंत्रज्ञान प्रामुख्याने ‘एआय’, क्लाऊड कम्प्युटिंग व प्रगत कॅमेरा सेन्सर्सवर आधारित आहे. याच्या चार कार्यपद्धती आहेत.
- रस्त्यांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी, मॅपिंग करण्यासाठी चारचाकी व दुचाकीवर विशेष कॅमेरे बसवले जातात. आवश्यकतेनुसार ड्रोनचा देखील वापर होतो.
- कॅमेऱ्यांनी टिपलेला सर्व डेटा ‘एआय’ प्रणालीत जमा होतो. मानवी हस्तक्षेपाविना रस्त्यांवरील खड्डे, तडे, खराब झालेले पॅच आणि इतर तांत्रिक दोष अचूकपणे शोधून काढते.
- रस्त्याचा नेमका किती टक्के भाग खराब आहे, याची अचूक माहिती काही सेकंदातच संबंधित अधिकाऱ्यांना मिळते.
- हा सर्व डेटा थेट क्लाउड-आधारित डॅशबोर्डवर अपलोड होतो. जिओ-टॅगिंगमुळे कोणत्या रस्त्यावर, नेमक्या किती अंतरावर खड्डे आहेत, याचे अचूक लोकेशन डॅशबोर्डवर अधिकाऱ्यांना एका क्लिकवर पाहता येते.
- डेटाचे विश्लेषण झाल्यानंतर, यंत्रणा स्वतःच ठरवते की कोणत्या रस्त्याची दुरुस्ती सर्वात आधी करणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाचे हे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
-----------------------
या प्रणालीचा फायदा काय ?
-मानवी सर्वेक्षणात अनेकदा लहान खड्डे किंवा तडे दुर्लक्षित होतात. मात्र, एआय तंत्रज्ञान आणि हाय-रिझोल्यूशन कॅमेऱ्यांमुळे रस्त्यावरील अगदी लहान तडे, खराब झालेले पॅच आणि खड्ड्यांची अचूक नोंद होते.
-रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्याचे ‘पोस्ट ॲनालिसिस’ डॅशबोर्डवर उपलब्ध असणार. त्यामुळे कंत्राटदाराने रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्य वापरले असेल, काम दर्जेदार झाले नसेल तर ते सिस्टीममध्ये लगेच उघडकीस येईल.
-काही ठिकाणी रस्त्यांची तांत्रिक रचनाच चुकीची असल्याने अपघात होतात. या स्थितीत अपघातप्रवण क्षेत्र शोधून व त्यावरचे उपाय ही प्रणाली सांगते.
------------------------
‘‘पुण्यातील ग्रँड टूर स्पर्धेसाठी तयार होत असलेल्या रस्त्यावर ‘एआय’ प्रणालीचा वापर सुरु आहे. आतापर्यंत १०० किलोमीटर रस्त्याचे मॅपिंग पूर्ण झाले. यामुळे रस्त्याचा दर्जा तर चांगला राहीलच शिवाय अपघात प्रवण क्षेत्र, रस्त्यावरील नेमके खड्डे आदी बाबतची देखील नेमकी माहिती मिळेल.
-भरतकुमार बाविस्कर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com