

सकाळ - सप्तरंग, ता. १७ मे २०२६ साठी...
-------------------------------------------------------------
सदर : ‘सिनेमा’ स्कोप
लेखक : सुहास किर्लोस्कर
-----------------------------------------------------------------
शीर्षक :
बुद्धिबळातल्या ‘चालींचा’ रुपेरी प्रवास...
----------------------------------------------------------------------
इंट्रो...
बुद्धिबळ काय आहे? प्रशिक्षकांच्या मते, गंमत म्हणून खेळणाऱ्यांसाठी तो एक गेम आहे आणि त्याकरिता आयुष्य पणाला लावणाऱ्यांसाठी ते एक शास्त्र आहे. एकाच विषयावर अनेक चित्रपट- डोक्युमेंट्री बघितल्यानंतर त्या विषयाचे विविध पैलू समजतात. चित्रपट समजण्यासाठी बुद्धिबळातील बारकावे माहीत असण्याची गरज नाही. चित्रपट बुद्धिबळाच्या खेळासंबंधी, खेळाडूच्या मानसिकतेविषयी, विजेते कसा वेगळा विचार करतात यासंबंधी, जगज्जेत्यांच्या जडणघडणीविषयी आहे.
--------------------------------------------------------------------------------
बॉबी फिशर या महान बुद्धिबळपटूचा टेबलवर फोटो दिसतो, त्यापुढे बुद्धिबळाचा पट, त्यावर काही प्यादी ब्लॅक अँड व्हाइटमध्ये दिसतात आणि आपल्याला एका लहान मुलाचा आवाज ऐकू येतो. तो जणू आपल्या कानात एक गोष्ट सांगतो आहे. ‘‘त्या दिवशी सगळेजण वाट बघत होते, तो आज येणार की नाही? तो त्या ठिकाणी (बुद्धिबळाची मॅच खेळायला) अजून आला नव्हता. अमेरिकेचा सेक्रेटरी ऑफ द स्टेट हेन्री किसिंजर याने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा निरोप सांगितला, देशाचा सन्मान राखण्यासाठी तू जरूर खेळ, तो सामना खेळण्यासाठी आला... पण फोटोग्राफर्सची गर्दी बघून नाराज झाला. तो जिंकला असता तर पहिला अमेरिकन वर्ल्ड चॅम्पियन झाला असता आणि हरला असता तर? .....आणि बॉबी फिशरने बुद्धिबळ सामना जिंकला, अमेरिकन जनतेचे मनही जिंकले. कारण त्यावेळी रशियाला सर्व क्षेत्रांत हरवणे हे प्रत्येक अमेरिकन व्यक्तीचे स्वप्न होते. पुढे काय झाले माहितीये?’’
क्षणार्धात चित्रपट रंगीत होतो आणि एका लहान मुलाचे लोभस डोळे आपल्याला दिसतात. सात वर्षांच्या जोशला बेसबॉलपेक्षा बुद्धिबळ आवडू लागते. एका फुटपाथवर अनेक जण स्टॉप वॉच लावून बुद्धिबळ खेळताना तो बघतो... आपल्यालाही बुद्धिबळाचा खेळ क्लोजअपमध्ये दिसतो, जोशच्या नजरेतून. त्याला त्या खेळाचे विलक्षण आकर्षण आहे. जोशची आई त्याच्या वडिलांना जोशच्या नवीन आवडीबद्दल सांगते. त्यानंतर वडील मुलाच्या आवडीनुसार बुद्धिबळाचा सेट आणतात. मुलांचे कौशल्य ओळखून त्याला वाव देणे म्हणजे काय? पाल्याला काय आवडते, त्याला कशाचा ध्यास आहे हे ओळखणे आणि त्यामध्ये त्याला ते करण्याची संधी देणे, हेच तर खरे पालकत्व, भले त्यामध्ये तो जिंकला/हरला तरी चालेल.
‘सर्चिंग फॉर बॉबी फिशर’ हा चित्रपट (प्राइमवर) प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासोबत बघायला हवा. मुलांची बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे, पालक मागे उभे आहेत. तिथला पर्यवेक्षक सगळ्या पालकांना सांगतो की, मुलांची मॅच सुरू असताना आवाज करू नका, डोळ्यांचे इशारे करू नका, खाकरू नका.... मुलांना खेळू द्या. पण काही पालक थोड्याच वेळात संयम सोडतात आणि पर्यवेक्षक सगळ्या पालकांना बाहेर काढतो. स्पर्धा पुन्हा सुरू होते आणि सर्व मुले टाळ्या वाजवतात... कारण त्यांना आता फक्त खेळावर लक्ष केंद्रित करता येणार आहे. जोशचे वडील त्याला बरोबर घेऊन ब्रूसकडे घेऊन जातात. ब्रूस हा स्पष्टवक्ता असलेला बुद्धिबळ कोच आहे. जोशमध्ये भावी बॉबी फिशर होण्याचे गुण आहेत, हे तो ओळखतो आणि त्या दृष्टीने ट्रेनिंग सुरू करतो.
मॅक्स पॉमरैंकने निरागस हुशार बालक जोशची भूमिका नैसर्गिकरीत्या केली आहे. त्याच्या वडिलांची भूमिका ‘बेबीज डे आउट’ फेम जो मांटेग्नाने तन्मयतेने साकारली आहे. ब्रूस झालेला बेन किंग्जले समजण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. बुद्धिबळ काय आहे? ब्रूसच्या मते, गंमत म्हणून खेळणाऱ्यांसाठी तो एक गेम आहे आणि त्याकरिता आयुष्य पणाला लावणाऱ्यांसाठी ते एक शास्त्र आहे. बॉबी फिशरसाठी ती एक कला आहे. जोशला बॉबी फिशरसारखे बुद्धिबळपटू बनायचे आहे पण त्याला बुद्धिबळाचा आनंद घ्यायचा आहे, बॉबी फिशरसारखे होऊ द्यायचे नाहीये. ब्रूस म्हणतो, तुला जिंकायचे असेल तर तुला त्यांचा द्वेष करावा लागेल. जोश म्हणतो, पण मला माझ्या विरुद्ध खेळणाऱ्यांचा द्वेष करायचा नाहीये. खेळायचे कशासाठी? जिंकण्यासाठी, समोरच्या खेळाडूचा पराभव करण्यासाठी, त्याला नामोहरम करण्यासाठी की खेळाचा आनंद घेण्यासाठी?
चित्रपटातील प्याद्यांचे क्लोज अप, रॅक फोकस लक्षवेधी आहेत, चित्रपट बघणाऱ्याला खिळवून ठेवतात. चित्रपट बुद्धिबळ खेळण्याबद्दल असला तरीही तो आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन विषद करतो. गेम खेळण्याच्या दोन पद्धती, त्याकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन दर्शवतात. नियम मोडणारा कलाकार अधिक उत्तम संगीतनिर्मिती करू शकतो, तसेच वेगळी मूव्ह करणारा खेळाडू सामना जिंकतो. चित्रपट बघताना बुद्धिबळातील बारकावे माहीत नसले तरीही चित्रपट कळू शकतो, कारण हा चित्रपट बुद्धिबळ खेळाबद्दल नाही, मुलांच्या संगोपनाबद्दल आहे, लहान मुले कसा विचार करतात याबद्दल आहे, कोच आणि जबाबदार पालक यामधील फरक सांगणारा आहे.
या चित्रपटानंतर पुढची पायरी, बॉबी फिशरच्या बुद्धिबळाविषयी, तो वर्ल्ड चॅम्पियन कसा झाला याबद्दलचा चित्रपट पॉन सॅक्रिफाइस प्राइमवर बघणे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच विविध देशांतील न्यूज टीव्ही चॅनेल ‘बॉबी फिशर वर्ल्ड चॅम्पियनशिप सामन्याकडे फिरकलाच नाही’ या आशयाच्या बातम्या देताना दिसतात. रशियन बुद्धिबळपटू बोरिस पास्की याच्याबरोबर दुसरा गेम खेळण्यासाठी बॉबी का आला नाही? त्याची मानसिकता काय होती? बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिपवर रशियनांचा प्रभाव मोडून काढण्यात बॉबी फिशर कसा यशस्वी झाला? याची गोष्ट त्याच्या लहानपणापासून त्याच्या जडणघडणीमधून बॉबीच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांना सांगण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.
बॉबी फिशर वर्ल्ड चॅम्पियन झाला, अनेक जण त्याची मुलाखत घेत होते, अनेक उच्चपदस्थ त्याच्याबरोबर वेळ घालवण्यात उत्सुक होते आणि एक दिवस अचानक तो गायब झाला. का?... बुद्धिबळ क्षेत्रात बॉबी फिशरचे नाव का घेतले जाते? याची कारणमीमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न ‘पॉन सॅक्रिफाइस’ चित्रपटात केला आहे. एक प्याद्याचा बळी देण्याची बॉबी फिशरची खेळी सुप्रसिद्ध आहे, त्याचा संदर्भ चित्रपटाच्या नावात आहे. परंतु चित्रपट समजण्यासाठी बुद्धिबळातील बारकावे माहीत असण्याची गरज नाही. चित्रपट बुद्धिबळाच्या खेळासंबंधी, खेळाडूच्या मानसिकतेविषयी, विजेते कसा वेगळा विचार करतात यासंबंधी, जगज्जेत्यांच्या जडणघडणीविषयी आहे. अनेक कलाकारांनी, खेळाडूनी प्रस्थापितांचे साम्राज्य नेस्तनाबूत करताना नियम मोडले, ठाम धारणा/पुस्तकी नियम याच्या पलीकडे जाऊन विचार केला, कृती केली, त्यामुळेच ते जगज्जेते झाले.
अनेक महान बुद्धिबळपटूप्रमाणे बॉबी फिशरला बुद्धिबळातील अनेक खेळी डोळ्यांसमोर दिसायच्या, बुद्धिबळाचा पट समोर नसला तरीही असे दिसणे म्हणजे काय हे, दृश्य स्वरूपात दिग्दर्शक एडवर्ड झ्विक यांनी चित्रपटामध्ये आपल्यासमोर मांडले आहे. बुद्धिबळ खेळण्यासाठी जी एकाग्रता लागते, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शांततेबद्दल बॉबी लहानपणापासून आग्रही होता. त्यामध्ये कोणकोणते अडथळे आले, कोणत्या परिस्थितीचा सामना त्याला वयाच्या बाराव्या वर्षी करावा लागला, याचे प्रसंग चित्रपटात बघितल्यानंतर मोठेपणी तो कसा वागला, का वागला याची उत्तरे मिळतात. स्पायडर मॅन फेम टोबी मॅग्वायारने बॉबी फिशरचे मानसिक द्वंद्व उत्तमरीत्या साकाराले आहे. उत्तम बायोपिकमध्ये त्या व्यक्तीचे गुण-दोष दाखवता दाखवता ते व्यक्तिमत्त्व कसे घडले याचे चित्र उभे केले जाते. हा चित्रपट बघताना बॉबी फिशरच्या वागण्याबद्दल काही प्रश्न पडतात. त्याची उत्तरे शोधण्याची इच्छा असल्यास पुढची पायरी म्हणजे ‘बॉबी फिशर अगेन्स्ट द वर्ल्ड’ ही डॉक्युमेंटरी यु-ट्युबवर बघणे.
बुद्धिबळ हा फक्त खेळ नाही, त्यापलीकडे बरेच काही आहे. राजे-महाराजे, युद्धात भाग घेणारे सैनिक आणि त्यांना आदेश देणारे नेते, शास्त्रज्ञ, विचारवंत, तत्ववेत्ते, व्यापारी, उद्योजक अशा अनेकांना भुरळ पाडणाऱ्या बुद्धिबळाचा इतिहास काय आहे? सहाव्या शतकात भारतामध्ये शतरंज या नावाने हा खेळ खेळला जायचा. इराण, चीन, अरेबिया, युरोप, मंगोलिया अशा अनेक राज्यात वेगवेगळ्या नावाने हा खेळ खेळला जाऊ लागला. नेपोलियन बोनापार्ट हा खेळ त्याच्या सेनापतीबरोबर खेळायचा. १५६१मध्ये या विषयावर पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. कालांतराने बुद्धिबळ या खेळाला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप आले. पॉल मर्फी हा पहिला जागतिक बुद्धिबळपटू समजला जातो. बॉबी फिशर म्हणायचा, मर्फी हा एकमेक बुद्धिबळपटू होऊन गेला, जो अचूक बुद्धिबळ खेळायचा. १८८६ मध्ये जागतिक बुद्धिबळ स्पर्धा सुरू झाली. विश्वनाथन आनंद म्हणतो, ‘‘आज जे बुद्धिबळ खेळले जाते, त्यामध्ये स्टायनित्झचे योगदान मोलाचे आहे.’’ ‘बॉबी फिशर अगेन्स्ट द वर्ल्ड’, ‘द हिस्ट्री ऑफ चेस चँपियनशिप’ या डॉक्युमेंटरी यु ट्युबवर आवर्जून बघाव्यात. ‘द क्विन्स गॅम्बिट’ (नेटफ्लिक्स - मिनी सिरीज), क्वीन ऑफ चेस (नेटफ्लिक्स), रिमॅच (प्राइम- वेब सिरीज) यामधून बुद्धिबळ खेळाचा मागोवा घेता येतो. एकाच विषयावर अनेक चित्रपट / डोक्युमेंट्री बघितल्यानंतर त्या विषयाचे विविध पैलू समजतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.