सुनंदन लेले - क्रीडा - सप्तरंग

सुनंदन लेले -  क्रीडा - सप्तरंग
Published on

सकाल - सप्तरंग, ता. १७ मे २०२६ ...
-----------------------------------------------------------------------------
सदर : क्रीडा
लेखक : सुनंदन लेले
-----------------------------------------------------------------------------------
शीर्षक
व्यक्तिपूजा की खेळ महत्त्वाचा...
-----------------------------------------------------------------------------------
मान्य आहे की पूर्वीच्या तुलनेत सगळ्याच खेळांना जरा बरे दिवस आले आहेत. क्रिकेटचा तर सुवर्णकाळ सुरू आहे. भारत सरकारही खेळासाठी चांगल्या उपाययोजना करत आहे. तरीही भारतात क्रीडासंस्कृती रुजली आहे, असे म्हणता येणार नाही. भारतातील क्रिकेटचे वेड वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचले आहे. एका बाजूला भारतीय क्रिकेटपटू माध्यमांकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना इतकी प्रसिद्धी मिळते आहे की माध्यमे आणि चाहते यांना भारतीय क्रिकेटपटू गृहीत धरू लागले आहेत. न मागता मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे आणि चाहत्यांच्या वेडामुळे माध्यमांची किंवा चाहत्यांच्या प्रेमाची फारशी किंमत भारतीय क्रिकेटपटूंना राहिलेली नाही. दुसऱ्या बाजूला बाकीच्या खेळातील दर्जेदार खेळाडूंना ना माध्यमे योग्य प्रसिद्धी देत आहेत, ना चाहते साधे ओळखत आहेत. क्रिकेटची लोकप्रियता आकाशाला भिडली असली तरी भारतात क्रिकेटच्या खेळापेक्षा व्यक्तिपूजा जास्त होत आहे. पटत नाही ना, एक उदाहरण देतो.

श्रीनिवास नावाचा माझा चांगला मित्र पुण्यातील एका एकदिवसीय क्रिकेट सामन्याला त्याच्या ४-५ वर्षांच्या मुलाला घेऊन येणार होता. क्रिकेट जगतात ओळख असल्याने त्याने पत्नी आणि मुलासाठी चांगल्या पासची सोय करून ठेवली होती. खेळ सुरू झाल्यावर एका तासाने तो भेटला तेव्हा मी, ‘‘कुठे बसले आहेत पत्नी आणि मुलगा’’... असे विचारले. तेव्हा त्याने हसत हसत सांगितले की, ‘‘ते गेले परत घरी. कारण माझा मुलगा विराट कोहलीचा चाहता आहे आणि तो बाद झाला म्हटल्यावर त्याला सामना बघण्यात कणभर रस नव्हता म्हणून ते दोघे परत गेले.’’ मी ऐकून हादरलो आणि ही कहाणी त्याने मुलाचे कौतुक करत असल्याचे सांगत कथन केली म्हणून मी हवालदिलच झालो. ४-५ वर्षांच्या मुलाला भारतीय क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय सामना मैदानावर येऊन चांगल्या जागेवरून बघण्यात रस नव्हता, तर त्याला त्याच्या हिरोला विराट कोहलीला बघायचे होते. तो बाद झाला म्हटल्यावर तो हट्ट करू लागला आणि त्याच्या पालकांनी त्याचा हट्ट पुरवताना त्याला घरी परत नेले... हे सगळेच मला न पटणारे होते.

सांगायची गोष्ट अशी की, भारतात लहान मुलांना क्रिकेटचा खेळ बघायची आवड कमी आणि फक्त आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला खेळताना बघायची आवड जास्त आहे. प्रत्येक लहान मुलाचा कोणी ना कोणी हिरो अस... तो मान्य आहे.... पण त्याचा परिणाम असा होणे हे लक्षण चांगले नाही.
जे खरे मोजके क्रीडाप्रेमी आहेत, त्यांना कल्पना आहे की बॅडमिंटन खेळात मानाच्या मानल्या गेलेल्या थॉमस कप सांघिक स्पर्धेत भारतीय संघाने २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकून कमाल केली होती. २०२६ मध्येही भारतीय संघाने दणकेबाज खेळ करून उपांत्यफेरी गाठली होती, ज्यात लक्ष्य सेनची एकेरीतील कामगिरी आणि सात्त्विक-चिराग जोडीची दुहेरीतील कामगिरी लक्षणीय ठरली होती. दुर्दैवाने उपांत्य सामन्याअगोदर लक्ष्य सेनला दुखापत झाली. भारताने फ्रान्स विरुद्धची लढत ०-३ ने गमावल्याने सात्त्विक-चिराग जोडीला भन्नाट फॉर्ममध्ये असून खेळताच आले नाही... कारण लढतीमधला त्यांचा सामना पाचवा होता. तरीही कांस्यपदकाची कमाई थॉमस कप स्पर्धेत करणे छोटी कामगिरी नव्हती. पण जेव्हा कांस्यपदक विजेता भारतीय संघ मायदेशात परतला तेव्हा परिस्थिती भयानक होती. ना त्यांचे स्वागत करायला बॅडमिंटन संघटनेचे पदाधिकारी विमानतळावर हजर होते... ना तिथे हजर असलेल्या लोकांनी या खेळाडूंना साधे ओळखले पण नाही. सगळे विमानतळावर राजकारणाची चर्चा करण्यात मग्न होते किंवा टीव्हीवर सुरू असलेला ‘आयपीएल’ सामना बघण्यात.
झाल्या प्रकारानंतर सात्त्विक-चिराग शेट्टी या जोडीने सोशल मीडियावरून नाराजी आणि त्यापेक्षा दु:ख व्यक्त केले. आमची अपेक्षा मोठ्या रकमेच्या बक्षिसाची नाही की स्वागत समारंभाची नाही. फक्त लोकांनी आम्हाला ओळखावे... कुणीतही लहान मुलाने-मुलीने येऊन आमची सही मागावी, आमच्यासोबत फोटोची मागणी करावी... इतकीच होती. सात्त्विक रेड्डीने आपले शल्य बोलून दाखवले.
सात्त्विक रेड्डी मत मांडताना म्हणाला, आम्ही विमानतळावर होतो, जर्मनीहून हैदराबादला सात तासांच्या प्रवासाने परत येत होतो. आम्ही कोण आहोत, आम्ही कोणती पदकं जिंकली आहेत, हे साधी विचारपूस करायलाही तिथे कोणी नव्हतं. तिथे बरेच भारतीय आणि तेलगू लोक होते. आम्ही थॉमस कपच्या जर्सी घातल्या होत्या, पण प्रत्येक जण आयपीएल, राजकारण किंवा इतर गोष्टींमध्ये व्यग्र होता.
२०२२ मध्ये जेव्हा आम्ही सुवर्णपदक जिंकलं, तेव्हाही असंच घडलं होतं. त्या विजयाचा आनंद अधिक मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला हवा होता. लोकांना हे समजत नाहीये की अशा संधी वारंवार मिळत नाहीत. थॉमस कप जिंकणं तर सोडाच, पण पदक मिळवणंही खूप कठीण असतं. जेव्हा आम्ही विमानतळावर उतरलो, तेव्हा प्रणॉय, श्रीकांत, ध्रुव असे सर्व खेळाडू स्वतःहून कॅब बुक करत होते. आजूबाजूला कोणाचंच लक्ष नव्हतं. माझे मित्र मला न्यायला आले होते, पण विमानतळावरचं ते दृश्य बघून मला खूप वाईट वाटलं – देशाचे अव्वल खेळाडू स्वतः कॅब बुक करण्याचा प्रयत्न करत होते.
चिराग शेट्टी त्याचे मत मांडताना म्हणाला, ‘अजूनही कोणाला काही फरक पडत नाही’ अशीच ती भावना होती. बघा, लोकांनी आमचं स्वागत करायला विमानतळावर यावं अशी आमची कधीच अपेक्षा नव्हती. मागच्या वेळी जेव्हा आम्ही जिंकलो होतो, तेव्हा आमचं चांगलं स्वागत झालं होतं, आम्ही पंतप्रधानांना भेटलो आणि आमचा सत्कारही झाला. पण ज्या पद्धतीने हा विजय साजरा व्हायला हवा होता, तसा तो झाला नाही. जे लोक बॅडमिंटन बघतात त्यांना याचं महत्त्व कळतं, पण सर्वसामान्य जनतेला २०२२ च्या विजयाची व्याप्ती माहीतच नाही. आपण अजूनही ‘स्पोर्टिंग नेशन’ (क्रीडाप्रेमी राष्ट्र) बनलेलो नाही, याचं मला वाईट वाटतं.
भारतात क्रिकेटचे वेड आहे, त्यात काही गैर नाही... पण बाकीच्या खेळांबाबत चाहत्यांची असलेली दैन्यावस्था दाखवून देते की भारतात क्रीडासंस्कृती रुजलेली नाही. लहान मुलांना आपण खेळावर प्रेम करायला शिकवतो का व्यक्तिपूजा करायला प्रोत्साहन देतो... हे पालकांनीसुद्धा तपासणे गरजेचे झाले आहे. आणि अर्थातच भारतीय प्रसार माध्यमांनी काम म्हणून क्रिकेटचे पूजन करावे पण बाकीच्या खेळांना जरा तरी योग्य प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.
हे सांगणे म्हणजे दगडावर डोके आपटण्याचा प्रयत्न आहे, असे मला वाटते... कारण मराठी बातम्या दाखवणाऱ्या वाहिन्यांनी नुकत्याच झालेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषक ही भारतात स्पर्धा होत असून कोणी पत्रकार वार्तांकन करायला पाठवला नाही तर त्यांना बाकीच्या खेळाचे वार्तांकन करायला काय सांगणार... कप्पाळ!

-----------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com