

बाजारपेठेच्या सुरक्षेला चोरट्यांचे आव्हान
ढेबेवाडीत चोरीच्या घटनेनंतर उपाययोजनांच्या चर्चेचे गुऱ्हाळ
राजेश पाटील : सकाळ वृत्तसेवा
ढेबेवाडी, ता. २४ : येथील गजबजलेल्या मुख्य चौकातील ज्वेलर्सचे दुकान टार्गेट करत चोरट्यांनी दिवसाढवळ्या नऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटून पोलिस यंत्रणेलाच आव्हान दिले. बाजारपेठेत यापूर्वीही अनेकदा चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. ज्या ज्या वेळी अशा घटना घडतात, त्यावेळी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विषय चर्चेला येतो. नुकत्याच झालेल्या घटनेनंतरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह सुरक्षेच्या उपाययोजनांचे गुऱ्हाळ पुन्हा सुरू झाले; परंतु प्रत्यक्षात उपाययोजनांची अंमलबजावणी कधी होणार? हा प्रश्न निरुत्तरितच आहे.
झपाट्याने विकसित होत चाललेल्या येथील, तसेच तळमावले बाजारपेठेचा पाटण तालुक्यातील काही मोजक्या आणि मोठ्या बाजारपेठांत समावेश होतो. अलीकडे कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोठी अपार्टमेंट, व्यापारी संकुले उभी राहिली. दोन्ही बाजारपेठांचे देखणे स्वरूप नजरेत भरू लागले. स्थानिकांसह विविध जिल्ह्यांतील व्यावसायिक येथे व्यवसायानिमित्ताने स्थायिक झाले. गुरुवारी तळमावलेचा, तर मंगळवारी ढेबेवाडीचा आठवडा बाजार असतो. त्यादिवशी बाजारपेठेला यात्रेचेच स्वरूप येते. वाढता विस्तार व उलाढालीच्या प्रमाणात दोन्ही बाजारपेठांतील व्यावसायिकांत सुरक्षिततेच्या बाबतीत जागरूकता दिसून येत नाही. त्याचाच गैरफायदा चोरटे उठवत आहेत. रात्रीच्या सुमारास दुकाने फोडल्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. चोरीच्या घटनेनंतर तेवढ्यापुरते व्यापारी व पोलिस एकत्र येतात. उपाययोजना सूचवतात; परंतु पुढे कार्यवाहीत सातत्य राहात नाही. असाच आत्तापर्यंतचा अनुभव आहे. येथील बसस्थानक परिसरातील चौकात घडलेल्या चोरीच्या घटनेने हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली. यापूर्वीही येथील बाजारपेठेत चोरीच्या घटना अनेकदा घडल्या; परंतु त्यातील किती चोऱ्यांचा तपास लागला? हा संशोधनाचाच विषय आहे. या चोरीच्या घटनेने आता येथे पुन्हा उपाययोजनांच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असले, तरी जोपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत त्याची शाश्वतीच वाटत नाही.
--------
चौकट
..............
पैसे जमा पण, कार्यवाहीच नाही.
विभागातील अनेक गावांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले, तरी येथील महत्त्वाच्या चौकांत त्याचा अभाव दिसून येत आहे. ढेबेवाडी आणि मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीच्या कक्षेत हा परिसर समाविष्ट आहे. मध्यंतरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पैसे जमा केले. मात्र, त्याची पुढे कार्यवाही झाली नाही.
B08941
ढेबेवाडी : बसस्थानक चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज आहे.
-------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.