हवामान बदलामुळे युरोप होरपळला

हवामान बदलामुळे युरोप होरपळला
Published on: 

वॉशिंग्टन, ता. २३ (पीटीआय) : या वर्षातील उन्हाळ्यात युरोपमध्ये पडलेल्या विक्रमी उष्णतेने ५० हजारहून अधिक लोकांचा बळी घेतला असून, यापैकी जवळपास दोन-तृतीयांश मृत्यूंना मानवी हस्तक्षेपामुळे झालेले हवामानबदल जबाबदार असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. कोळसा, तेल आणि वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे वाढलेल्या तापमानाचा हा थेट परिणाम असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेली आकडेवारी वास्तव परिस्थितीपेक्षा कमी असू शकते, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. कारण, यामध्ये मे महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेचा समावेश नाही. तसेच, हा अभ्यास केवळ ८५४ शहरांपुरता मर्यादित असून, ही शहरे युरोपच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ४० टक्के भागाचे प्रतिनिधित्व करतात.

अभ्यासाची व्याप्ती व निरीक्षणे
- ८५४ युरोपीय शहरांमध्ये जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत वारंवार उष्णतेच्या लाटा
- या कालावधीत ५०,३९१ जणांचा मृत्यू वाढलेल्या तापमानामुळे
- त्यापैकी ३२,६१९ मृत्यू हे मानवी हस्तक्षेपामुळे वाढलेल्या तापमानामुळे
- तापमानातील सरासरी वाढ ५.३ अंश सेल्सिअस
- सर्वाधिक मृत्यू इटली, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमध्ये
- उष्णतेमुळे मृत्यू झालेल्यांपैकी अर्ध्याहून अधिक लोक ८५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे

उन्हाळ्यातील मृत्यूंच्या संख्येत वाढ
वर्ष : मृतांची संख्या
२०२२ : २९,४८०
२०२६ : ५०,३९१
वाढ : ७१ टक्के

गणनेची पद्धत आणि अचूकता
संशोधक गटाने ५० हजार मृत्यूंपैकी नेमके किती मृत्यू हवामान बदलामुळे झाले, हे शोधण्यासाठी प्रस्थापित वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला. त्यांनी कॉम्प्युटर सिम्युलेशनद्वारे ‘हवामान बदल नसलेले जग’ कसे असते, याचे प्रारूप तयार केले आणि त्याची तुलना या उन्हाळ्यातील प्रत्यक्ष मृत्यूंशी केली. या दोन्हींमधील फरक हा जागतिक तापमान वाढीमुळे झालेला परिणाम मानला जातो. अनेकदा मृत्यू प्रमाणपत्रामध्ये उष्णतेचा उल्लेख मुख्य घटक म्हणून केला जात नाही, त्यामुळे प्रत्यक्ष मृतांची संख्या नोंदवलेल्या आकड्यापेक्षा जास्त असू शकते. हे टाळण्यासाठी संशोधकांनी ८५४ शहरांमधील वय आणि स्थानिक तापमानानुसार एक जटिल गणितीय समीकरण वापरले. या गणनेची पडताळणी सरकारी संस्थांच्या आकडेवारीशी केली असता, ती बऱ्याच अंशी जुळत असल्याचे आढळले.

कोट
युरोप हा जगातील सर्वात वेगाने तापणारा खंड आहे. आर्क्टिक प्रदेश यापेक्षाही वेगाने तापत आहे. औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत युरोप आता २.५ अंश सेल्सिअस अधिक उष्ण झाला आहे. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे होणारी ही तापमान वाढ वरवर पाहता कमी वाटू शकते, परंतु अनेकांसाठी हे अतिरिक्त अडीच अंश सेल्सिअस तापमान जीवघेणे आहे.
- क्लेअर बार्न्स, संशोधक

जमिनीवर सांडलेले पाणी पुसून काढण्यासोबतच आपल्याला नळ दुरुस्त करण्याचाही जसा विचार करावा लागतो. त्याप्रमाणे, केवळ उष्णतेशी जुळवून घेणे पुरेसे नाही, तर समस्येच्या मुळाशी जाऊन जीवाश्म इंधनाचा वापर थांबवणे हेच खरे प्रतिबंधात्मक पाऊल ठरेल.
- प्राध्यापक डॉ. जोनाथन पॅट्झ, शास्त्रज्ञ, विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com