

भारत-पोलंड भागीदारीतून
संयुक्त उद्योग उभारावेत
पंतप्रधान टस्क यांची अपेक्षा : तंत्रज्ञान, ‘एआय’ क्षेत्रातील सहकार्यवाढीवर भर
बंगळूर, ता. २३ (पीटीआय) : ‘‘भारत आणि पोलंडने पारंपरिक व्यापाराच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अवकाश क्षेत्रात सहकार्य वाढवावे. दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारीचे रूपांतर संयुक्त उद्योगांमध्ये व्हावे,’’ असे आवाहन पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी शुक्रवारी केले.
भारत-पोलंड व्यवसाय मंचाला संबोधित करताना त्यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑगस्ट २०२४ मधील पोलंड दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांतील संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्यात आला. त्यानंतरच्या कृती आराखड्यात तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि अवकाश क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे. या घोषणांची अंमलबजावणी करून ठोस संयुक्त प्रकल्प उभारण्याची वेळ आली आहे. भारताच्या माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्राला पोलंडच्या ‘सॉफ्टवेअर’, ‘क्लाऊड’ प्रणाली, स्वयंचलन आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील कौशल्याची जोड देता येईल. भारताची ‘यूपीआय’ प्रणाली आणि पोलंडच्या ‘ई-गव्हर्नन्स’ सेवा व ‘एमओबायवाटेल’ डिजिटल ओळख प्रणालीचा उल्लेख करून त्यांनी डिजिटल सेवांमधील सहकार्याच्या संधी अधोरेखित केल्या.
औद्योगिक स्वयंचलन, माहिती विश्लेषण, वैद्यकीय निदान आणि पायाभूत सुविधांच्या व्यवस्थापनासाठी ‘एआय’चा वापर वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लघू व मध्यम उद्योग, विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनीही यंत्र-अध्ययन व माहिती विश्लेषण क्षेत्रात सहकार्य करावे, असे ते म्हणाले.
अवकाश क्षेत्रातही संयुक्त प्रकल्प
अवकाश क्षेत्र हे उभय देशांमधील सहकार्याचे दुसरे प्रमुख क्षेत्र असल्याचे टस्क यांनी सांगितले. ते म्हणाले, की भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेचा आणि युरोपीय अवकाश संस्थेतील पोलंडच्या सहभागाचा त्यांनी उल्लेख केला. उपग्रहांचे घटक, पृथ्वी निरीक्षण, दिशादर्शन प्रणाली आणि अवकाश सुरक्षा क्षेत्रांत संयुक्त प्रकल्प उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. २०२५ मधील ‘अॅक्सिओम-४’ मोहिमेत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि पोलंडचे अंतराळवीर सावोश उझनान्स्की-विस्निव्हस्की यांच्या सहभागाला त्यांनी ‘द्विपक्षीय सहकार्याचे प्रतीक’ संबोधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.