

सातारा टुडे मेन
................
पिके करपूनही सरकारचे दुर्लक्ष
कोरेगाव, कऱ्हाडला दुष्काळी यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश; सोयाबीनसह भुईमूग वाया
सचिन शिंदे, पांडुरंग बर्गे : सकाळ वृत्तसेवा
कऱ्हाड, कोरेगाव, ता. ८ ः दुष्काळी परिस्थितीमुळे कोरेगाव व कऱ्हाड तालुक्यांत शेंगा भरण्याच्या काळातच सोयाबीन वाळून गेले आहे. भुईमुगाच्या आऱ्या मातीतच करपल्या आहेत. कष्टाने पिकवलेले शिवार डोळ्यांसमोर करपताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही. दुष्काळाच्या झळा सोसत असतानाही कोरेगाव व कऱ्हाड तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश न झाल्याने बळीराजा आक्रोश करत आहे. या दोन्ही तालुक्यांत जिरायती, कोरडवाहू पिकांचे ५० ते ८० टक्के नुकसानीचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
जिरायत ८० टक्के पिके खाक
कृषी विभागाच्या अधिकृत अहवालानुसार, कऱ्हाड तालुक्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३२ हजार ५७६ हेक्टर आहे. त्यापैकी ३२ हजार ३६४ हेक्टरवर ९९.३५ टक्के पेरणी झाली होती. एक जून ते ३० सप्टेंबर दरम्यान तालुक्यात सरासरी ५८७.६० पैकी ४९३.७० मिलिमीटर म्हणजे ८४ टक्केच पाऊस झाल्याने पावसाचा सलग खंड पडला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या ड्रायस्पेलने पिकांचा बळी घेतला आहे. उंडाळे, येळगाव, उंब्रज, इंदोली, कवठे, मसूर, कोपर्डे हवेली, सैदापूर, काले मंडलात सलग पावसाचा खंड राहिला आहे. सोयाबीनीची १५ हजार ७८२ हेक्टरची ९४.२२ टक्के पेरणी झाली आहे. शेंगा भरण्याच्या व परिपक्वतेच्या काळात पाण्याचा ताण आहे. त्यामुळे शेंगा पोचट, तर दाण्यांचा आकार लहान आहे. भुईमूगाच्या ११ हजार १५२ हेक्टरवरील १२४.९१ टक्के पेरणी झाली आहे. त्याच्या आऱ्यांना शेंगा लागल्या नाहीत, तर काही ठिकाणी शेंगा अपरिपक्व आहेत. भाताच्या तीन हजार ९०७ हेक्टरवर ९५.१४ टक्के पेरणी झाली आहे. फुलोरा अवस्थेत असलेला भात वाळून जात आहेत.ज्वारी सुकण्याच्या वाटेवर आहेत.
....................
कोरेगावात खरीप अडचणीत
....
कोरेगाव तालुक्यात खरीप हंगामात २५ हजार १०३ हेक्टरवर म्हणजेच १०३.१२ टक्के पेरणी झाली होती. एक जून ते ३० सप्टेंबर दरम्यान तालुक्यात सरासरी ६२५.५ पैकी ४९४.९ मिलिमीटर म्हणजे ७९ टक्केच पाऊस झाला असून, पावसाचा खंड पडल्याने निर्माण झालेल्या ड्रायस्पेलने पिकांचा बळी घेतला आहे. सोयाबीन, भुईमूग, भात आणि खरीप ज्वारी यांच्या वाढीच्या, फुले लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेतच पाण्याचा ताण पडल्याने पिकांचे तब्बल ८० टक्के नुकसान झाले आहे. सोयाबीनची ९०.४० टक्के पेरणी झाली असून, शेंगा भरण्याच्या व परिपक्वतेच्या काळात पाण्याचा ताण आल्याने शेंगा पोचट, तर दाण्यांचा आकार लहान आहे. भुईमूगाची ४७९.३८ टक्के पेरणी झाली असून आता आऱ्यांना शेंगा लागल्या नाहीत, तर काही ठिकाणी शेंगदाणा अपरिपक्व आहेत. घेवड्याची १०६.८६ टक्के पेरणी झाली होती. ही पिकेही सुकण्याच्या वाटेवर आहेत. मका पिकाची ११४.०० हेक्टरवर पेरणी झाली होती. तालुक्यात ५० ते ८० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट दिसून येत आहे.
............................
आमदार भोसलेंचा मुख्यमंत्र्यांना अहवाल
कऱ्हाड तालुक्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन येथील स्थिती मांडली आहे. तालुक्यात १४ महसूल मंडल आहेत. तेथे पावसाचा प्रत्यक्ष पडलेला ड्रायस्पेल आणि जिरायतीतील ८० टक्के नुकसानीची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. तांत्रिक नियमावलीची ढाल न करता प्रत्यक्षात वाळलेल्या शिवाराचा विचार करून कऱ्हाडचा दुष्काळी यादीत करावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. दुष्काळी यादीतून तालुका वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनेही तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला आहे. दुष्काळी यादीत समावेश न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
.............................
कोट
पावसाचे कागदी गणित दाखवून सरकार प्रत्यक्ष शिवारातील वाळलेली पिके नाकारू शकत नाही. सलग महिनाभर पाऊस नसेल, तर त्याला दुष्काळ म्हणायचे नाही काय, शासनाने वस्तुस्थिती पाहून कऱ्हाड तालुक्यात त्वरित दुष्काळ घोषित करून नुकसान भरपाई व सवलती लागू कराव्यात.
- दादासाहेब शेवाळे,
शेतकरी, मनव (ता. कऱ्हाड)
..............................
कोट
कोरेगाव उत्तर भागात पाऊस नसल्याने घेवड्याचे पीक पूर्ण वाया गेले आहे. पाण्याअभावी रब्बी पेरणीही शक्य नाही. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या यादीत कोरेगाव तालुक्याचा समावेश प्राधान्याने होणे गरजेचे आहे. अन्यथा येथील शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
- कमलाकर भोईटे (तळवळे सं. वाघोली, ता. कोरेगाव)
.............................
कोट
कऱ्हाड तालुक्यात यंदा सोयाबीन, भुईमुगाची जास्त लागवड आहे. पिकांची वाढ अन् उत्पादनाच्या कालावधीत पावसाने दीर्घकाळ दडी मारली आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटल्याने पिके वाळली आहेत. पाऊस नसल्याने त्याचा खरिपाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. ड्रायस्पेलचा कालावधी, पिकांवर झालेला परिणाम आणि दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन कऱ्हाड तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
- डॉ. अतुल भोसले,
आमदार, कऱ्हाड
.............................
PNE26W55919
मनव (ता. कऱ्हाड) ः पावसाने दडी मारल्याने पिके वाळून गेली आहेत.
..........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.