

विजयन, मुलगी, जावयावर
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
पावणे तीन कोटींच्या कथित व्यवहाराचे प्रकरण
सकाळ न्यूज नेटवर्क
तिरुअनंतपुरम, ता. ९ : केरळमचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन, त्यांची मुलगी टी. वीणा आणि जावई मोहंमद रियास यांच्यासह अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश केरळ उच्च न्यायालयाने आज दिले. वीणा यांच्या कंपनीला कथितरीत्या बेकायदा पैसे दिल्याप्रकरणी राज्याच्या दक्षता विभागाला न्यायालयाने हे निर्देश दिले.
कोची येथील कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड या कंपनीने वीणा यांच्या ‘एक्सालॉजिक सोल्युशन्स’ या माहिती-तंत्रज्ञान कंपनीला २.७८ कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. कोणतीही सेवा न घेता सल्लागार शुल्काच्या नावाखाली ही रक्कम दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे. या प्रकरणात ईडीने गेल्या महिन्यात विजयन यांच्यासह अन्य संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. मात्र, राज्य सरकारने गुन्हा दाखल करण्याऐवजी प्राथमिक चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांचे माजी खासगी सचिव के. एम. शहाजहॉं यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायाधीश ए. बदरुद्दीन यांनी याचिका मंजूर केली. ईडीच्या आरोपानुसार, या व्यवहारांतून विजयन यांना वीणा यांच्या माध्यमातून ३.२८ कोटी रुपये लाच म्हणून मिळाले. तसेच, हे पैसे दुबईला पाठविण्यास रियास यांनी मदत केल्याचा आरोप आहे. विजयन यांनी हे आरोप फेटाळले असून निर्दोष असल्याचे म्हटले आहे. विजयन यांच्याविरोधात यापूर्वी एसएनसी-लाव्हलिन प्रकरणातही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. १९९५ ते १९९७ या काळात ते राज्याचे ऊर्जामंत्री असताना जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी कॅनडातील एसएनसी-लाव्हलिन कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या व्यवहारामुळे राज्याच्या तिजोरीचे ३७४.५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप होता. मात्र, विशेष सीबीआय न्यायालय आणि केरळ उच्च न्यायालयाने त्यांना त्या प्रकरणातून मुक्त केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.