शेतकऱ्यांना आवर्तनाची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना आवर्तनाची प्रतीक्षा
Published on: 

नारायणगाव, ता. २३ : कुकडी प्रकल्पातील धरणांतून पुणे, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांतील रब्बी पिकांच्या सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या नियोजनासाठी लवकरच बैठक होणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना कालव्यातून सुटणाऱ्या आवर्तनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कुकडी प्रकल्पातील धरणात सप्टेंबरअखेर २८.५१ टीएमसी (९६.०८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. आजअखेर कुकडी प्रकल्पात २८.०२१ टीएमसी (९४.४२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. शिल्लक पाण्याचा विचार करून जुन्नर, आंबेगाव, शिरूर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, पारनेर या सात तालुक्यांतील रब्बी पिकांच्या सिंचनासाठी व बिगर सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे. कुकडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील तालुके शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे या आवर्तनाच्या नियोजनाकडे शेतकरी, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचे लक्ष लागले आहे.
तापमानात मोठी वाढ झाल्याने कुकडी प्रकल्पाच्या धरणातील जलसाठ्याच्या पृष्ठभागाचा बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. मागील एक महिन्यात प्रकल्पीय पाणीसाठ्यात ०.४९ टीएमसी (४९० दशलक्ष घनफूट) घट झाली आहे. बाष्पीभवन, डिंभे धरणाला सुरू असलेली गळती व अन्य कारणामुळे मागील एक महिन्यात कुकडी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात जवळपास अर्धा टीएमसीने घट झाली आहे. सरासरी रोज १६ दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. बाष्पीभवन व अन्य कारणामुळे पुढील सात महिन्यात (नोव्हेंबर ते मे) पाणीसाठ्यात होणाऱ्या घट याचा विचार करून आवर्तन नियोजन करणे आवश्यक आहे.
यापूर्वी रब्बी हंगामात सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा आढावा घेतल्यास सात तालुक्याच्या सिंचनासाठी एका आवर्तनासाठी किमान साडेसहा ते सात टीएमसी पाण्याची गरज असते. दुष्काळी परिस्थिती व उपलब्ध पाण्याचा विचार करता आवर्तनाचे काटेकोर नियोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

धरणानिहाय आजचा उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये व कंसात टक्केवारी : येडगाव : १.८९ (९७.६३), माणिकडोह : ९.२१२ (९०.४९), वडज : १.१०८ (९४.४६), पिंपळगाव जोगे : ३.४३५(८८.३०), डिंभे : १२.३७६ (९८.९४).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com