महाराष्ट्राचं चांगभलं !

महाराष्ट्राचं चांगभलं !
Published on: 

निलेश महिगावकर लेख
-----------------------
महाराष्ट्राचं चांगभलं!
............................

भारतीय कृषी संस्कृतीत सणांना मोठे महत्त्व आहे. नुकतीच घटस्थापना झाली आणि घटही उठले. भारतीय सांस्कृतिक परिप्रेक्षात या सणाचे महत्त्व पाहावयाचे झाल्यास इथल्या मूळच्या कृषी संस्कृतीतून या सणाची सुरुवात झाल्याचे दिसते. कालांतराने त्याला ऐतिहासिक संदर्भ जोडले गेले. काही प्रथा आणि परंपरा जोडल्या गेल्या. शेंदुरात देव माखावा आणि त्या देवाचा मूळ अवतार विलुप्त व्हावा असंही झालं.

‘दसरा’ हा सत्याचा असत्यावर विजय मानला जातो. याला विजयादशमी म्हणतात. दहा दिवसांच्या युद्धाचा हा समारोप मानला जातो, तर पांडवांनी अज्ञातवासातून बाहेर येऊन शमीच्या झाडाखाली लपवलेली आपली शस्त्रं बाहेर काढल्याचा प्रवाद आहे. महिषासुराच्या मर्दनाशीही ही गोष्ट जोडली जाते.

मुळातच काळाच्या पटलावर त्या त्या काळात ज्या सत्ता प्रबळ असतात त्या परंपरा ठरवतात. महात्मा फुले याच विषयाची मांडणी करताना, वामनाच्या कपटाने मारल्या गेलेल्या बळीराजाची गोष्ट सांगतात. न्यायी, पराक्रमी, लोकहितदक्ष बळीराजाची आजही लोकं आठवण काढतात. दसरा ते दिवाळी हा बळीराजाच्या आठवणीचा काळ मानला जातो. यावर डॉ. आ. ह. साळुंखे आपल्या ‘बळीवंश’ या पुस्तकात अधिक प्रकाश टाकतात.
बळीराजाच्या राजधानीत घुसून वामनाने जेव्हा तिथलं सोनं लुटलं तेव्हापासून शिलंगणाचे सोने लुटण्याची विपरीत प्रथा सुरू झाली. तथापि बाणासूराची लोकं जेव्हा युद्ध करून माघारी परतले तेव्हा त्यांच्या स्त्रियांनी बळीच्या हत्येनंतरही पुन्हा दुसरा बळी येऊन देवाचे राज्य स्थापिले, याविषयी भविष्य जाणून त्यांनी आपल्या उंबऱ्यात उभ्या राहून त्यास ओवाळून ‘इडा पिडा जाऊ दे आणि बळीचे राज्य येऊ दे’ अशी उद्‍घोषणा केली. त्या दिवसापासून आजपर्यंत शेकडो वर्षांची ही परंपरा बळीच्या राज्यातील कित्येक भागांमध्ये क्षत्रिय वंशाच्या स्त्रियांनी दर वर्षी सोडलेली नाही.
शेतकरी कष्टकरी आणि त्यांच्या कृषी परिप्रेक्षात हीच गोष्ट पाहिली, तर काही असेही तर्क आहेत, की रब्बी हंगामात पेरावयाच्या बीजाची उगवण क्षमता तपासण्यासाठी हे बीज मडक्यात माती भरून त्यात लावले जाते. ही माती ज्या वावरात पेरणी करावयाचे आहे तिथली लागते. याच मातीत मग बीजाचे उगवण क्षमता तपासली जाते, जेणेकरून हे बी उगवण्यास सक्षम आहे किंवा नाही, याची प्रयोगशाळा म्हणजे हा सण आणि मग हेच उगवलेले बी पांढऱ्या टोपीच्या वर तुऱ्यासारखे खोवून अत्यंत अभिमानाने एकमेकाची ऊराऊरी भेट घेऊन हा सोहळा साजरा केला जातो.
खंडोबाच्या, म्हणजेच बळीराजाच्या खंडकऱ्यांच्या प्रांतात ही प्रथा, बीज लावून आणि याचा समारोप यळकोटच्या गजरात तळी ऊचलून होते. मराठी भाषेच्या जडणघडणी संदर्भात सदानंद कदम शब्दांची कहाणी सांगतात, त्यात ते यळकोट शब्दाचा अर्थ सांगतात, की खंडोबाचे जागरणावेळी रंगीत वस्त्रांनी सजवलेली काठी नाचवत नाचवत खंडोबाचा जयजयकार केला जातो. त्यावेळी खंडोबाचे भक्तगण म्हणतात ‘येळकोट येळकोट जय मल्हार!’ मल्हारीच्या जयजयकाराचा हा शब्द आला तो थेट दक्षिणेतून. एळू आणि कोट्टे या दोन शब्दांपासून तो तयार झालायं. तमिळ एळू म्हणजे वर उचलणे, तर कन्नड येळुगे म्हणजे भरभराट होवो. तमिळ कोट्टे अर्थात मंदिर किंवा काठी. येळकोट म्हणजे काठी उंच धरा, उचला म्हणून भक्तगण म्हणतात ‘एळकोट एळकोट जय मल्हार’ त्याचं झालंय ‘येळकोट येळकोट जय मल्हार!’ म्हणजे खंडोबाचा ध्वज सदैव उंच राहो. त्याचा जयजयकार असो! आणि यळकोटचाही झाला ‘येळकोट’
इडा पिडा जावो ही प्रार्थनाही अशीच आहे..! इडा ही मनूची मानसकन्या मानली जाते. तिची पिडा टाळावी अशी वर्षानुवर्षे मनोकामना केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यामुळेच मनूची स्मृती नष्ट करावीशी वाटली आणि शरद पोंक्षेसारखे दीड दमडीचे नट मनू स्मृतीला संविधान मानतात याहून मोठं दुर्दैव या पुरोगामी महाराष्ट्राचं असू शकत नाही!
सध्या महाराष्ट्र दुष्काळ झेलत आहे. सरकारी पातळीवर ‘यळकोट’ सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष आम्हीच कसं महाराष्ट्राचं ‘चांगभलं’ करत आहे, अशी ‘तळी’ उचलत आहे. पाचशे कोटींच्या गुलाल खोबऱ्यात आणि आॕडिओ क्लिपच्या गजरात महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. कोण किती खाली घसरतोय याचं हे अधोगतीनं होणारं ‘सीमोल्लंघन’ आहे. त्यात जीव बळीराजाचाच जात आहे! बोला, ‘येळकोट येळकोट, चांगभलं ! महाराष्ट्राचं चांगभलं !’

-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com