सरकारला शिक्षक पुरस्कारांचा विसर

सरकारला शिक्षक पुरस्कारांचा विसर
Published on: 

पुणे, ता. ३ : राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे राज्यातील शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांची घोषणा ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या आधी करण्यात येते. परंतु, यंदा एक महिना उलटला तरी शिक्षक पुरस्कारांची घोषणा झालेली नाही. आता हे पुरस्कार घोषित करणे आणि पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणखी लांबणीवर पडला आहे.
शिक्षण विभागाने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६ची घोषणा अद्याप केलेली नाही. या पुरस्कारांची घोषणा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. शिक्षक दिन होऊन आता एक महिना होत आला तरी पुरस्कारांची अधिकृत घोषणा झालेली नाही. पुरस्कारासाठीची निवड प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम प्रस्ताव शासनाकडे सादर झाल्याची माहिती असतानाही शासन निर्णय प्रलंबित असल्याने राज्यातील संभाव्य पुरस्कारार्थी शिक्षकांमध्ये प्रतीक्षा कायम आहे.
शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यस्तरीय निवड प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्टमध्ये अंतिम निर्णय अपेक्षित होते. त्यानंतर पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुरस्कार वितरणाचे नियोजन होते. मात्र नियोजित वेळ उलटून गेल्यानंतरही घोषणा झालेली नाही.
राज्य शिक्षक पुरस्कार हा केवळ सन्मानाचा सोहळा नसून गुणवंत शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाची राज्य सरकारकडून घेतलेली अधिकृत दखल आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निर्णयासाठी अनिश्चित प्रतीक्षा नको, तर पुढील काळात ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळबद्ध करण्याची गरज आहे, असे मत शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.
याबाबत शिक्षण विभागाची अधिकृत बाजू जाणून घेण्यासाठी राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

शिक्षण विभागातर्फे दरवर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यातून पाच ते सहा पुरस्कार असतात. परंतु, या पुरस्कारांबाबत राज्य सरकार कधीही नियमितता पाळत नाही. हे पुरस्कार म्हणजे शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानांचा गौरव आहे. शिक्षांचा सन्मान वेळेत होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सरकारने पुरस्काराचे वेळापत्रक ठरवून त्याप्रमाणेच दरवर्षी कार्यवाही करावी, त्यात खंड पडू नये.
- नंदकुमार सागर, सचिव, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Teachers Constituency
Teacher Award 2026 Sandeep Shinde Receives Pune District Honour After Transforming School And Guiding Students To Success
Droupadi Murmu with Dr Kiran Jharkar National Teacher Award
Kiran Jharkar
Marathi News Esakal
www.esakal.com