परदेशी अमेरिकी नागरिकांविरोधात प्रस्ताव महत्त्वाच्या पदांवर काम करण्यास बंदी; डेमोक्रॅटिक पक्षाचा विरोध

परदेशी अमेरिकी नागरिकांविरोधात प्रस्ताव
महत्त्वाच्या पदांवर काम करण्यास बंदी; डेमोक्रॅटिक पक्षाचा विरोध
Published on

वॉशिंग्टन, ता.२१ (पीटीआय) :परदेशात जन्मलेल्या अमेरिकी नागरिकांना काँग्रेसचे सदस्यत्व, मध्यवर्ती न्यायालयांचे न्यायाधीशपद आणि अमेरिकी काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदांवर काम करण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव सिनेटर नॅन्सी मेस यांनी आज मांडला.
या प्रस्तावावर डेमोक्रॅटिक पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असून, हा प्रस्ताव द्वेषपूर्ण आणि वंशवादावर आधारित असल्याची टीका केली आहे. मेस या दक्षिण कॅरोलिनाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी आज सोशल मीडियावर यासंदर्भातील घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मांडल्याचे जाहीर केले. या प्रस्तावानुसार अमेरिकेचे नागरिकत्व मिळवलेल्या परदेशी व्यक्तींना प्रतिनिधिगृह, सिनेट, फेडरल न्यायालये तसेच सिनेटच्या मान्यताप्राप्त पदांवर काम करण्यास बंदी घालण्यात येईल. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी आधीपासून असलेली ‘जन्मतः अमेरिकन नागरिक’ ही अट इतर पदांनाही लागू करण्याचा प्रस्ताव आहे.
अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी जे निकष आहेत, तेच निकष या पदांसाठीही असावेत,'' असे मेस यांनी म्हटले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये इल्हान उमर, प्रमिला जयपाल आणि श्री ठाणेदार या लोकप्रतिनिधींची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. ओमर या सोमाली अमेरिकी नागरिक आहेत, तर जयपाल आणि ठाणेदार हे भारतीय वंशाचे आहेत. मेस यांचा हा प्रस्ताव जरी डेमोक्रॅटिक खासदारांना लक्ष्य करणारा असला, तरी त्याचा परिणाम काही रिपब्लिकन खासदारांसह इतर अनेक सदस्यांवर होऊ शकतो. ‘अमेरिकेचे कायदे तयार करणाऱ्या आणि जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींची निष्ठा केवळ अमेरिकेशीच असायला हवी,’ असे मेस यांनी उमर यांचा संदर्भ देत म्हटले.

वंशवादाने प्रेरित प्रस्ताव
या प्रस्तावावर प्रमिला जयपाल यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. ‘‘हा प्रस्ताव देशाच्या इतिहासाचा अपमान करणारा आणि वंशवादाने प्रेरित आहे. अशा संकुचित विचारसरणीला अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये स्थान नाही,’’ असे त्या म्हणाल्या. काँग्रेसमधील २६ सदस्य परदेशात जन्मलेले असून त्यात रिपब्लिकन सदस्यांचाही समावेश आहे, मात्र मेस यांनी केवळ प्रगतशील कृष्णवर्णीय लोकप्रतिनिधींनाच लक्ष्य केल्याचे सुझॅन बोनामिसी यांनी नमूद केले आहे.
भारतीय वंशाचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी हा प्रस्ताव नैतिकदृष्ट्या चुकीचा असल्याचे सांगितले.


आम्ही मेहनत करून अमेरिकेत आलो आणि देशासाठी योगदान दिले आहे. कष्ट करून देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्यांना लक्ष्य करू नका.
श्री ठाणेदार, भारतीय वंशांचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com