

एटीएम मशीन घेऊन चोरटे आडमार्गाने पसार
पोलिसांची चार पथके तपासात; १५ गावांचे रस्ते, १०० ‘सीसीटीव्ही’चे फुटेज पडताळले
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : विडी घरकूल परिसरातील सग्गम नगरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रातील मशीनच शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेली. मशीनमध्ये एक लाख ७९ हजार १०० रुपये होते. चोरट्यांनी त्यांच्याकडील मालवाहतूक वाहनात मशीन भरली आणि मुळेगाव रोडवरून दहिटणेमार्गे पुढे मार्डीपर्यंत गेले. रविवारी पोलिसांची चार पथके तपासातच होती. पोलिसांनी मार्डी ते धाराशिव टोल नाक्यापर्यंतचे १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज पडताळले. या भागातील सुमारे १५ गावांमधील ५० पेक्षा जास्त रस्त्यांवरील देखील फुटेज पडताळले.
‘एसबीआय’च्या एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक नव्हता, मशीनला मजबूत फाउंडेशन नव्हते. याचा फायदा उचलत चोरट्यांनी तेथील एटीएम मशीनला दोर लावला आणि मशीन बाहेर ओढून गाडीत भरले. जाताना त्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरून नेला आहे. मशीन चोरीनंतर मुंबईतील स्ट्राँग रुममध्ये अलार्म वाजला. तेथून पोलिसांना कळविण्यात आले आणि सातव्या मिनिटात पोलिस तेथे पोचले. पण, तोपर्यंत चोरटे सोलापूरबाहेर पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सगळीकडे माहिती पसरविली, नाकाबंदी केली. मात्र, चोरटे सापडले नाहीत. गाडीला मागील बाजूला नंबरप्लेट नव्हता, समोरील बाजूचा नंबरप्लेट लाईटच्या फोकसमुळे नंबर स्पष्टपणे दिसत नाही. या प्रकरणी किरण संजय लांडगे (रा. स्वातंत्र्य सैनिक नगर, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली असून सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव तपास करीत आहेत.
-----------------
चौकट
२० मिनिटात चोरी करून चोरटे पसार
मालवाहतूक चारचाकी घेऊन सोलापुरात आलेले तिघे अवघ्या २० मिनिटात मशीन चोरी करून शहराबाहेर पसार झाले. तीन-चार दिवसांपूर्वी त्या मशिनमध्ये दोन लाख रुपये भरले होते, त्यात सध्या एक लाख ७९ हजार १०० रुपये होते. चोरटे मुळेगाव रोडवरून पावणेतीनच्या सुमारास आले, तेथून राजेश पायलट चौकातून ‘एटीएम’जवळ पोचले. त्यांनी सात ते आठ मिनिटांत दोर लावून मशीन बाहेर काढले, गाडीत भरले आणि लगेचच पसार झाले. हैदराबाद रोडवरून विरुद्ध दिशेने गेलेले चोरटे मुळेगाव रोडवर तीन-चार सेकंद थांबले. त्यांनी मशीन थोडी आत ढकलल्याचे ‘सीसीटीव्ही’त कैद झाले आहे.
----------------
चौकट
चोरट्यांचा गावागावांतील रस्त्यांवरून प्रवास
शहरातील एटीएम मशीन चोरून पसार झालेल्या चोरट्यांनी दहिटणे, मार्डीसह अन्य गावांच्या रस्त्यांवरून प्रवास केला. त्यांनी मुख्य रस्त्याचा वापर जाणीवपूर्वक टाळला. गुगल मॅपचा वापर करून चोरट्यांनी गावांतर्गत रस्त्यांवरून प्रवास केला असावा किंवा अशा रस्त्यांची माहिती असणारे चोरटे असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.