

सत्तर टक्के उसाची तोडणी मजुरांमार्फत करा
मळी आणि बगॅस राखून ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांचे साखर कारखान्यांना आदेश
ॲग्रोवन वृत्तसेवा
धाराशिव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना आदेश देत सुमारे ७० टक्के उसाची मजुरांच्या माध्यमातूनच तोडणी करावी, तसेच एकूण उसापैकी ३० टक्के ऊस चाऱ्यासाठी राखीव ठेवावे व उत्पादित बगॅस आणि मळीपैकी ३० टक्के साठाही दुष्काळ निवारण, चारा व पशुखाद्य निर्मितीसाठी राखीव ठेवावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे हार्वेस्टरने तोडणीचे नियोजन केलेल्या कारखान्यांची चांगलीच गोची झाली असून कर्जाच्या फेडीची चिंताही हार्वेस्टर चालकांना लागली आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करणे आणि स्थानिक ऊसतोड मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. येत्या गाळप हंगामात जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी ऊस तोडणीपैकी किमान ६० ते ७० टक्के ऊसतोडणी मजुरांमार्फत करावी, तसेच एकूण ऊस क्षेत्रापैकी ३० टक्के ऊस चाऱ्यासाठी राखीव ठेवावा, असे जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
साखर कारखान्यांनी उत्पादित बगॅस (Bagasse)आणि मळीपैकी (Molasses) प्रत्येकी ३० टक्के साठा दुष्काळ निवारण, पशुधनासाठी चारा व पशुखाद्य निर्मितीसाठी राखीव ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे. या आदेशांमुळे चारा उपलब्धतेचे नियोजन करण्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांचे संभाव्य स्थलांतर रोखण्यास मदत होणार असल्याची आशा जिल्हा प्रशासनाला आहे. हार्वेस्टरने ऊसतोडणी करताना उसाचा हिरवा पाला अर्थात वाढा याचा चाऱ्यासाठी अपेक्षित उपयोग होण्यात अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे, मजुरांमार्फत ऊसतोडणी केल्यास पशुधनासाठी वाढ्याची उपलब्धता वाढण्यास मदत होते. तसेच स्थानिक ऊसतोड मजुरांना रोजगार मिळतो. त्यामुळे गाळप हंगामात किमान ६० ते ७० टक्के तोडणी मजुरांमार्फत करावी आणि हार्वेस्टरचा वापर मर्यादित ठेवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तर एकूण ऊस लागवडीखालील क्षेत्रापैकी ३० टक्के ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शक्यतो उसाच्या वाढ्याची साठवणूक कारखानास्तरावर करून दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध होईल, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
चौकट...
काटेकोर अंमलबजावणी अन् अहवालाचे बंधन
जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी. केलेल्या कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि विशेष लेखा परीक्षक, वर्ग-१, सहकारी संस्था (साखर), धाराशिव यांच्याकडे सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ तसेच इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करणे, स्थानिक मजुरांच्या रोजगाराचे संरक्षण करणे आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे, हा या निर्देशांचा मुख्य उद्देश आहे. बगॅसपैकी ३० टक्के साठा राखीव ठेवावा, प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय हा राखीव साठा बाहेर विक्रीसाठी किंवा अन्य कामांसाठी वापरता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मळीच्या ३० टक्के साठ्याचेही नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पुजार यांनी दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.