सोमेश्वर कारखान्याकडून दिवाळी गोड

सोमेश्वर कारखान्याकडून दिवाळी गोड
Published on: 

वडगाव निंबाळकर, ता. २३ : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठी ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,८०० रुपये अंतिम ऊसदर जाहीर केला होता. त्यानुसार उर्वरित अंतिम बिल प्रतिटन पाचशे रुपयांप्रमाणे सभासदांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. तर, कामगारांना १५ टक्के आगाऊ बोनस दिवाळी भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार व खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने हा निर्णय घेतल्याचे यादव यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, मागील हंगामातील ऊसदरापोटी नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यांत तुटलेल्या उसासाठी प्रतिटन ३,८०० रुपये, फेब्रुवारीत तुटलेल्या उसासाठी ३,९०० रुपये, तर मार्चमध्ये तुटलेल्या उसासाठी प्रतिटन ४,००० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. तर, गेटकेन उसाला अंतिम ऊसदर प्रतिटन ३,४०० रुपये निश्चित केला होता. यापूर्वी दिलेले सर्वाना प्रतिटन ३,३०० रुपये दिले होते. उचल वजा जाता सभासदांना प्रतिटन ५०० रुपये; तर गेटकेनधारकांना उर्वरित १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे रक्कम दिली गेली. सभासदांना ६०.११ कोटी रुपये वर्ग केले असून, कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांनाही ९० लाख रुपये वर्ग केले आहे. हंगाम २०२०-२१ मधील कपात केलेली ठेव रक्कम व त्यावरील व्याज, असे २४.१५ कोटी रुपये, तसेच २०२३-२४ मधील ठेवीवरील ४.०० कोटी रुपये व्याजदेखील सभासदांच्या खात्यावर वर्ग केले आहेत.
कारखाना कायम व हंगामी कामगारांसाठी १५ टक्के बोनस व अ‍ॅडव्हान्सपोटी ३.३३ कोटी रुपये, तर कंत्राटी कामगारांना ८,५०० रुपयांप्रमाणे २१ लाख रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे. याशिवाय वेतनवाढीतील फरकाची पहिल्या हप्त्याची १.६८ कोटी रुपये आणि रोजंदारी पगाराची रक्कम २८ लाख रुपये रक्कम कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साडेबारा लाख टन उसाचा अंदाज
सन २०२५-२६च्या हंगामात कारखान्याने १२ लाख १८ हजार ५५९ टन उसाचे गाळप केले असून, सरासरी १२.२७ टक्के साखर उताऱ्यासह १५ लाख ५७ हजार ६५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सहवीज प्रकल्पातून वीज निर्मिती, तसेच डिस्टिलरी प्रकल्पातून अल्कोहोल व इथेनॉल उत्पादनही घेण्यात आले. आता चालू हंगामात १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू झाले असून, आतापर्यंत ६१ हजार ५२० टन उसाचे गाळप झाले आहे. यंदा ३८ हजार ५०० एकर क्षेत्रावर ऊस लागवड असून, १२ ते १२.५० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन यादव यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com