पालखी मार्गावर कठडे बसविण्यास सुरुवात

पालखी मार्गावर कठडे बसविण्यास सुरुवात
Published on

इंदापूर, ता. ७ ः जगद्‍गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्गावरील इंदापूर या टप्प्यात अनेक ठिकाणी सुरू असलेले काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने अपघाताचे धोके वाढत चालले होते. या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत संबंधितांकडून धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे बसवण्याचे काम सुरू केले आहे.
पालखी सोहळ्यातील वैष्णवांची वाट सुकर व्हावी म्हणून या मार्गाचे जिल्हा मार्गावरून राज्य मार्गावर रूपांतर करीत विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये देहू ते पाटस, पुणे- सोलापूर महामार्ग व तेथून बारामती मार्गे इंदापूर अकलूज व पंढरपूर असे पालखी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले.
यामधील पाटस ते बारामती हा टप्पा पूर्ण करीत तेथून टोल वसुलीही सुरू करण्यात आली. मात्र, बारामती ते इंदापूर हा टप्पा गेली अनेक वर्ष अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असताना योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत अशा धोकादायक ठिकाणी तत्काळ संरक्षक कठडे बसविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रवाशांनी ‘सकाळ’चे आभार मानले.


पालखी मार्गावर धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे बसवण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्याने दखल घेत कठडे बसविण्यास सुरुवात करण्यात आली. याबद्दल ‘सकाळ’चे धन्यवाद. तसेच, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील इंदापूर ते बारामती दरम्यान रखडत सुरू असलेल्या पुलांच्या कामांचा वेग वाढवावा व वृक्षांच्या संगोपनावर भर द्यावा. आवश्यक त्या ठिकाणी मराठीत सूचनाफलक लावावेत
-ॲड. श्रीकांत करे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी सुकाणू समिती, पुणे.

पालखी मार्ग हा आषाढी वारीतील वैष्णवांच्या सेवेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेला उपक्रम आहे. मात्र हा उपक्रम वैष्णवांच्याच आर्थिक लुटीचा मार्ग ठरण्याची शक्यता आहे. या मार्गावरून पंढरपूरकडे जायचे झाल्यास एकट्या पुणे जिल्ह्यात पाटस, उंडवडी, बेलवाडी, सराटी या चार ठिकाणी टोल द्यावे लागणार आहेत. विशेष बाब म्हणजे यातील दोन ठिकाणी हे एकट्या इंदापूर तालुक्यात असणार आहेत. यामुळे पांडुरंगाचे दर्शन हे स्वतःचे वाहन घेऊन जाणाऱ्यांसाठी आर्थिक फटका देणारे ठरणार आहे. त्यामुळे या मार्गावरील टोलबाबतचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
- राजू भोंग, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, इंदापूर तालुका विद्यार्थी आघाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com