भोरच्या पश्‍चिम भागात वन्यप्राण्यांचा धुडगूस

भोरच्या पश्‍चिम भागात वन्यप्राण्यांचा धुडगूस
Published on: 

महुडे, ता.१७ : भोरचा पश्‍चिम भागात वन्यप्राणी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फटका बसत आहे. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कितीही युक्त्या केल्या तरी वन्यप्राणी पिकांत धुडगूस घालीत आहेत. भातासह इतर पिकांची नासधूस होत असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यामुळे वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

भोरचा पश्चिम भाग डोंगराळ भागात यंदा चांगल्या असलेल्या पिकांत वन्य प्राण्यांनी शिरकाव केल्याने मोठे नुकसान होत आहे. यात रानडुकरे, वानरे, माकडे, सांबर, भेखर, ससे व मोर आदी प्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान होत आहे. जुन्या साड्या व रंगीत कापडांचे कुंपण करणे, रात्रीची राखण करणे, भुजगावणे उभारणे, पत्राचे डबे -फटाके वाजवणे, बिसलेरी बाटलीत वाळू भरून तारेला बांधणे आदी वेगवेगळ्या प्रकारे शक्कल लढवून शेतकरी आपल्या पिकाचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यातून ही रानटी प्राणी मोका शोधून शेतात शिरतात व शेताचे नुकसान करतात. त्यामुळे रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी पुरा वैतागला आहे. त्यामुळे वनविभागाकडून काहीतरी भरपाई मिळेल या आशेवर शेतकरी वनविभागाकडे अर्ज करीत आहेत.

मुळातच डोंगर भाग असल्याने डोंगर उतारावर शेती केली जाते. या भागात नाचणी, वरई पिके अल्प प्रमाणात घेतली जातात. याच पिकांच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असते. यावर्षी अगदी पेरणीपासून आजपर्यंत समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे भात पीक जोमात आहेत.

वन्य प्राण्यांच्या प्रत्येक वर्षीच्या त्रासातून मुक्तता व्हावी यासाठी कायम स्वरूपाच्या कुंपणासाठी शासनाने अर्थ सहाय्य करावे, वन्यप्राणी हुसकवण्यासाठी उपकरणे उपलब्ध करावीत तसेच वनविभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई नुकसानीच्या अल्प प्रमाणात मिळत असल्याने ती वाढवून मिळावी.
- धोंडिबा मालुसरे, शेतकरी हिर्डोशी

हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचे रानडुकरांनी नुकसान केले आहे. त्यामुळे पीक चांगले असूनही रानडुकरांमुळे झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनात घट होणार असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
- भिवबा पारठे, शेतकरी कोंढरी

वन्य प्राण्यांपासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे अर्ज करावेत. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई दिली जाईल."
- शीतल राठोड, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी, भोर

01200

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.